परभणी- जिंतूर रस्त्यावर एक तास रास्तारोको
By Admin | Updated: June 6, 2017 14:20 IST2017-06-06T14:20:33+5:302017-06-06T14:20:33+5:30
टाकळी येथील शेतक-यांनी परभणी- जिंतूर रस्त्यावर एक तास रास्तारोको केल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

परभणी- जिंतूर रस्त्यावर एक तास रास्तारोको
>ऑनलाइन लोकमत
परभणी, दि 6 - संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी सहाव्या दिवशीही शेतक-यांचे आंदोलन सुरूच आहे. मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास टाकळी येथील शेतक-यांनी परभणी- जिंतूर रस्त्यावर एक तास रास्तारोको केल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण ग्रामस्थांच्या वतीने मंगळवारी १० ते ११ या वेळेत टाकळी कुंभकर्ण फाट्यावर हे आंदोलन केले. शेतक-यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, पिकांना हमी भाव द्यावा, स्वामीनाथन आयोग लागू करावा यासह आदी मागण्यांसाठी परभणी- जिंतूर महामार्गावर एक तास रस्तारोको आंदोलन करण्यात आले.
त्यामुळे या रस्त्यावर दोन्ही बाजूनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अचानक झालेल्या या रास्ता रोकोनं प्रवाशांची मात्र मोठी गैरसोय झाली. या आंदोलनात सरपंच विनायकराव सामाले, टी.एम. सामाले, प्रभाकर जैस्वाल, किशोर देशमुख यांच्यासह ग्रामस्थांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.
(48 तासांत कर्जमाफी जाहीर करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू - शेतकरी)
तर दुसरीकडे, संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त झुगारुन आंदोलक शेतकऱ्यांनी मंगळवारी (6 जून) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला कलूप लावलं व आपल्या भावना प्रशासनासमोर मांडल्या.
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, या प्रमुख मागणीसाठी किसान क्रांती समन्वय समितीने जिल्ह्यात सहा दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. सोमवारी जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यानंतर मंगळवारी शासकीय कार्यालयांना कुलूप ठोकून शेतकऱ्यांच्या भावना प्रशासन व शासनापर्यंत पोहोचवण्याचे नियोजन करण्यात आले.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. नियोजनानुसार सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास शेतकरी आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले.
मुख्य प्रवेशद्वारासमोर बंदोबस्त असल्याने काही वेळ हे आंदोलक याच परिसरात ठाण मांडून बसले. त्यानंतर दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास प्रवेशद्वाराजवळ जाऊन काहींनी लोखंडी गेट ओढून घेत त्या गेटला कुलूप टाकण्याचा प्रयत्न केला.
गेटला कुलूप लागलेही परंतु लगेच पोलीस कर्मचाऱ्यांनी हे कुलूप काढले. या प्रकारानंतर जिल्हाधिकारी पी.शिवा शंकर यांच्याशी आंदोलकांनी चर्चा केली. शासनाने ४८ तासात कर्जमाफी जाहीर करावी, अशी आमची मागणी आहे. शेतकऱ्यांच्या भावना आपल्या मार्फत शासनाला कळवाव्यात. अन्यथा यापुढे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. यावेळी जिल्हाधिकारी पी. शिवा शंकर यांना आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
मानवतमध्ये ३५ शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल
मानवत येथील तहसील कार्यालयाला शेतकऱ्यांनी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास कुलूप ठोकले. पोलिसांनी नंतर हे कुलूप काढले. या प्रकरणी ३५ शेतक-यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. पालम येथेही दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास शेतक-यांनी तहसील कार्यालयास टाळे ठोकले.