परभणी मनपा आरक्षण निश्चित; 'खुला' प्रवर्गाची जागा वाढताच एकच जल्लोष, तर काहींचा हिरमोड
By राजन मगरुळकर | Updated: November 11, 2025 12:50 IST2025-11-11T12:48:47+5:302025-11-11T12:50:15+5:30
परभणी महापालिका ६५ जागांसाठी आरक्षण सोडत; काही इच्छुक आनंदी, तर काहींच्या स्वप्नांवर पाणी

परभणी मनपा आरक्षण निश्चित; 'खुला' प्रवर्गाची जागा वाढताच एकच जल्लोष, तर काहींचा हिरमोड
परभणी : शहर महापालिकेच्या संभाव्य २०२५ च्या निवडणुकीसाठी मंगळवारी सकाळी बी.रघुनाथ सभागृह येथे आरक्षण निश्चिती व सोडत कार्यक्रम जाहीर झाला. यामध्ये एकूण ६५ जागांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले. मागील २०१७ च्या निवडणुकीनंतर यंदा खुला प्रवर्गासाठी एक जागा वाढली तर नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी एक जागा घटली आहे. यासह विविध प्रवर्गातील जागांचे आरक्षण निश्चित झाले. 'कही खुशी कही गम' असे चित्र या आरक्षण निश्चितीनंतर पहावयास मिळाले.
परभणी शहर महापालिकेच्या वतीने मंगळवारी आयुक्त तथा प्रशासक नितीन नार्वेकर, नगरसचिव विकास रत्नपारखे, उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे, शहर अभियंता वसीम पठान, संगणक विभाग प्रमुख अदनान कादरी, पवन देशमुख, राजकुमार जाधव यांच्यासह प्रमुख अधिकारी, विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत निश्चित करण्यात आली.
मनपामध्ये एकूण ६५ जागा सदस्यांसाठी असून या जागांमध्ये खुला प्रवर्ग, खुला प्रवर्ग महिला, अनुसुचित जाती, अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला अशा प्रवर्गांचे आरक्षण निश्चित झाले. या आरक्षण सोडवतील ऐकण्यासाठी व आरक्षण निश्चित प्रक्रियेसाठी शहरातील इच्छुक उमेदवारांनी बी रघुनाथ सभागृह येथे गर्दी केली होती. एक एक प्रभागाचे आरक्षण निश्चित होताच इच्छुकांनी आपल्या मनाप्रमाणे आरक्षण निघाल्यास जल्लोष केला तर काहींनी हिरमोड झाल्याने सभागृहातून काढता पाय घेतला. विशेष करून युवकांचा जल्लोष अधिक प्रमाणात होता.
मनपा संभाव्य सदस्यांसाठी जागांचे आरक्षण
सन २०२५ ची सध्याची स्थिती
एकूण ६५
खूला २०
खूला महिला - १९
एससी ८ (४ महिला)
एसटी १ (महिला)
ओबीसी १७ (९ महिला)