परभणी मनपा आयुक्तांची बनवाबनवी! अभियंत्यांच्या पदोन्नती प्रकरणी चौकशी समिती कागदावरच?
By राजन मगरुळकर | Updated: October 15, 2025 12:20 IST2025-10-15T12:19:17+5:302025-10-15T12:20:09+5:30
पदोन्नतीसाठी कुणाचे 'वजन'? नियमांना धाब्यावर बसवून झालेल्या या प्रकरणाचा विभागीय आयुक्तांनी तपास करावा.

परभणी मनपा आयुक्तांची बनवाबनवी! अभियंत्यांच्या पदोन्नती प्रकरणी चौकशी समिती कागदावरच?
परभणी : मनपातील नऊ अभियंत्यांना वर्ग दोनच्या पदावर पदोन्नतीच्या प्रकरणात समिती नेमणार असल्याचे आयुक्त नितीन नार्वेकर यांनी अनेकदा सांगितले. पालकमंत्र्यांनाही तेच आश्वासन दिले. मात्र प्रत्यक्षात त्याचे आदेशच निघाले नाही. या प्रकरणामुळे वैद्यकीय रजेवर गेलेले तत्कालीन प्रभारी उपायुक्त बबन तडवी हे सोमवारी सायंकाळी मनपामध्ये आयुक्तांच्या पूर्व परवानगीने रुजू झाले अन् पुन्हा रजेवर गेले. आयुक्तांची सुरू असलेली ही बनवाबनवी पाहता आता थेट विभागीय आयुक्तच यात लक्ष घालतील काय? अशी अपेक्षा परभणीकरांना आहे.
सहायक आयुक्त बबन तडवी यांना तत्कालीन आयुक्त धैर्यशील जाधव यांनी प्रभारी उपायुक्त केले. त्यांच्या काळात स्वच्छता, बांधकाम, पाणीपुरवठा विभागातील पदोन्नत्यांचे कुंभाड रचले गेले. मात्र स्वच्छतेच्या पदोन्नत्या झाल्या अन् ऑगस्टमध्ये नितीन नार्वेकर हे आयुक्त म्हणून रुजू झाले. अभियंता संवर्गातील नऊ जणांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव नियमाला धरून नसल्याने आधी बाजूला पडला. मात्र त्या संचिकेवर इतके वजन पडले की तो मंजूर झाला. याला विरोध सुरू झाला. आयुक्तांना वर्ग दोनच्या पदावर पदोन्नती देण्याचे अधिकार नसताना राज्य शासनाच्या परवानगीविना पदोन्नती देण्यात आल्या.
याबाबत लोकमतने बारकावे, शासकीय नियमांचे केलेले उल्लंघन आदी बाबींवर प्रकाश टाकला. कर्मचारी संघटनाही विरोध दर्शवित आहेत. मात्र समिती नेमण्याचे ठेवणीतील उत्तर आयुक्त वारंवार देत आहेत अन् समितीही स्थापन करीत नाहीत. त्यामुळे यात गौडबंगाल आहे, हे निश्चित. मात्र ते स्वत:च यात अडकणार आहेत, ही खरी भीती आहे. विभागीय आयुक्तांनीच यात आता अपर आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची समिती नेमली तर सत्य उजेडात येईल. फक्त त्याचे हाल परभणीतील महसूल कर्मचाऱ्यांच्या बदली प्रकरणाच्या चौकशीप्रमाणे होवू नयेत म्हणजे मिळविले.
तर आयुक्त आदेश पाळतात कुणाचा?
मनपा कर्मचारी संघटनेच्या कामबंद आंदोलनाच्या वेळी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी पदोन्नती प्रश्नावर आयुक्तांना चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे सूचित केले. मात्र, त्यांच्याही आदेशाला आजपर्यंत आयुक्त नितीन नार्वेकर यांनी जुमानले नाही. त्यामुळे आयुक्त आदेश पाळतात तरी कोणाचे, असा प्रश्न पडला आहे.
चौकशी आदेशावरच प्रश्नचिन्ह?
तत्कालीन प्रभारी उपायुक्त बबन तडवी हे वैद्यकीय रजेवर गेल्यानंतर प्रभारी उपायुक्त म्हणून प्रज्ञावंत कांबळे यांच्याकडे पदभार दिला. तडवी यांची चौकशी प्रज्ञावंत कांबळे हे करतील, असे आयुक्तांनी स्पष्ट केले होते. याबाबत चौकशी आदेश निघाला की नाही, यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार असा आदेशच अजून काढला नाही. तर तडवींनी पुन्हा रुजू होण्याचा केलेला प्रयत्न मात्र कर्मचारी संघटनांनी हाणून पाडला.