परभणी : दूध उत्पादकांचे अनुदान थकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 23:28 IST2019-06-05T23:27:36+5:302019-06-05T23:28:00+5:30
शासनाकडून खरेदी करण्यात येत असलेल्या दुधाचे मागील दोन महिन्यांपासून अनुदान थकीत असल्याने दूध उत्पादक संस्था आणि शेतकरी अडचणीत सापडले आहेत़

परभणी : दूध उत्पादकांचे अनुदान थकले
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (परभणी) : शासनाकडून खरेदी करण्यात येत असलेल्या दुधाचे मागील दोन महिन्यांपासून अनुदान थकीत असल्याने दूध उत्पादक संस्था आणि शेतकरी अडचणीत सापडले आहेत़
परभणी जिल्ह्यात मागील काही वर्षांत शेतकरी मोठ्या प्रमाणावर दूध व्यवसायाकडे वळले आहेत़ यावर्षी दुष्काळी परिस्थिती असतानाही शेतकरी आपले पशूधन सांभाळून दूध विक्री करीत आहेत़ शासकीय दूध खरेदी केंद्रावर दूध विक्री केल्यानंतर १५ दिवसांत दूध उत्पादक संस्थांना शासनाचे दुधाचे अनुदान वितरित करणे अपेक्षित असते़ मात्र मागील दोन महिन्यांपासून दुधाचे अनुदान थकले आहे़ पाथरी तालुक्यातील ३५ दूध उत्पादक संस्था दररोज किमान २५ हजार लिटर दुधाचा पुरवठा करतात़ मात्र मागील दोन महिन्यांपासून अनुदान मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत़ परभणी जिल्ह्यात पाथरी तालुक्यातून सर्वाधिक दूध पुरवठा होतो़ शासनाने जिल्ह्याला २०१९-२० या वर्षात दूध खरेदीसाठी मंजूर १६ कोटी रुपयांपैकी केवळ ५ कोटी रुपयांचेच दूध खरेदीचे अनुदान वितरित केले आहे़ मंजूर अनुदानातील ११ कोटी रुपये अद्यापही शिल्लक आहेत़ त्यामुळे दूध उत्पादक संस्थेचे २ महिन्यांची देयके थकले आहेत़ याकडे तत्काळ लक्ष देऊन थकीत अनुदान वाटप करावे, अशी मागणी आ़ मोहन फड यांनी पशूसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे़ दरम्यान, राज्य शासन थकीत अनुदान लवकरच उपलब्ध करून देईल, असे आश्वासन मंत्री महादेव जानकर यांनी दिल्याची माहिती आ़ मोहन फड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़