परभरणी : राष्ट्रीय महामार्गाच्या साईडपट्ट्यावर खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 00:08 IST2019-07-08T00:07:58+5:302019-07-08T00:08:44+5:30
शहरातून जाणाऱ्या पालम ते गंगाखेड या राष्ट्रीय महामार्गाचे उन्हाळ्यात हॉटमिक्स करण्यात आले होते. या रस्त्याच्या कडेने साईडपट्टया भरण्याचे काम निकृष्ट करण्यात आल्याने पहिल्याच पावसात रस्त्याच्या कडेने खड्डे पडले असून वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. संबंधित यंत्रणेचे याकडे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे.

परभरणी : राष्ट्रीय महामार्गाच्या साईडपट्ट्यावर खड्डे
लोकमत न्यूज नेटवर्क
पालम (परभरणी): शहरातून जाणाऱ्या पालम ते गंगाखेड या राष्ट्रीय महामार्गाचे उन्हाळ्यात हॉटमिक्स करण्यात आले होते. या रस्त्याच्या कडेने साईडपट्टया भरण्याचे काम निकृष्ट करण्यात आल्याने पहिल्याच पावसात रस्त्याच्या कडेने खड्डे पडले असून वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. संबंधित यंत्रणेचे याकडे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे.
पालम शहरातून गंगाखेड ते लोहा हा राष्ट्रीय मार्ग जातो. या राज्यमार्गाचे राष्ट्रीय मार्गात रूपांतर झाल्यानंतर रस्त्यावरील जागोजागी पडलेले खड्डे बुजविण्यासाठी शासकीय यंत्रणेने पालम तालुक्याच्या हद्दीत उन्हाळ्यामध्ये रस्त्यावर हॉट मिक्स केले. त्यामुळे वाहन चालकाची डोकेदुखी काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली. हॉटमिक्सचे काम झाल्यानंतर दोन्ही बाजुंनी मुरुमाने साईट पट्ट्या भरण्याचे काम करण्यात आले होते. हे काम करताना संबंधितांनी दुर्लक्ष केल्याने जागोजागी मुरुमांचे ढिग टाकण्यात आले होते. पालम शहरातून गंगाखेडकडे जात असताना साईट पट्ट्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात पाणी साचून चिखल निर्माण झाला असून अनेक वाहनांचे अपघात होत आहेत. रस्ता सोडून कडेला येत असताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. पाऊस पडताच या खड्ड्यात पाणी साचून वाहनचालकांची गैरसोय वाढली आहे. साईडपट्ट्या भरण्याचे काम अतिशय निकृष्ट झाले असूनही राष्ट्रीय महामार्गाच्या यंत्रणेने दोषींना पाठीशी घालण्याचा सपाटा सुरू ठेवलेला आहे. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय वाढली असून यंत्रणेला त्याचे सोयरसुतक राहिलेले नाही. विशेष म्हणजे शहरातील विश्रामगृहाच्या इमारतीत राष्ट्रीय महामार्गाचे कार्यालय थाटण्यात आले असून या ठिकाणी कर्मचारी हजर राहत नाहीत. येथील कर्मचारी अप-डाऊन करीत असल्याने कामावर कोणाचेही नियंत्रण राहिले नाही.
अपघाताची शक्यता
पालम- गंगाखेड या राज्य रस्त्याचा दर्जा वाढवून त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला. महामार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर उन्हाळ्यात या रस्त्यावर हॉटमिक्सचे काम करण्यात आले. त्याचबरोबर साईडपट्ट्यांचेही काम होत असताना संबंधित विभागाने लक्ष दिले नाही. परिणामी, संबंधित गुत्तेदाराने थातूरमातूर काम केले. गेल्या आठवड्यापासून होत असलेल्या पावसाने या साईडपट्ट्या उखडल्या असून आहेत. त्यात पाणी साचत असल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.