परभणी : अपंग मतदारांसाठी स्वतंत्र प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 00:45 IST2018-12-02T00:44:18+5:302018-12-02T00:45:20+5:30
येत्या लोकसभा निवडणुकीसाठी जास्तीत जास्त अपंग मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा, यासाठी जिल्हा निवडणूक विभाग स्वतंत्ररित्या प्रयत्न करणार असून, जिल्हा पातळीवर समितीचीही स्थापना करण्यात आली आहे़

परभणी : अपंग मतदारांसाठी स्वतंत्र प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येत्या लोकसभा निवडणुकीसाठी जास्तीत जास्त अपंग मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा, यासाठी जिल्हा निवडणूक विभाग स्वतंत्ररित्या प्रयत्न करणार असून, जिल्हा पातळीवर समितीचीही स्थापना करण्यात आली आहे़
जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे़ प्रशासनाने मतदार यादी अद्ययावत केली असून, लवकरच अंतीम मतदार यादीही प्रसिद्ध केली जाणार आहे़ जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत महिला मतदार, नव मतदार यांना मतदान प्रक्रियेत समाविष्ट करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न केले़ आता अपंग मतदारांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे़ भारत निवडणूक आयोगाने या वर्षासाठी सुलभ निवडणुका हे घोषवाक्य जाहीर केले आहे़ त्यानुसार अपंग घटकातील प्रत्येक मतदाराला निवडणूक प्रक्रियेत समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे़
याच अनुषंगाने जिल्हास्तरावर एक समितीही गठीत करण्यात आली आहे़ या समितीत जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर हे अध्यक्ष असतील़ त्याच प्रमाणे समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर हे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील़ तर जिल्हा समाजकल्याण अधिकारी भोजने, शिक्षणाधिकारी (प्रा़) आशा गरुड, शिक्षणाधिकारी (मा़) वंदना वाव्हुळे, महापालिकेच्या उपायुक्त विद्या गायकवाड यांच्यासह सक्षम अपंग संघटनेचे अध्यक्ष संजय वाघमारे, प्रहार अपंग संघटनेचे अध्यक्ष राजेश तिपाले यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे़ दरम्यान, या समितीची पहिली बैठक शनिवारी पार पडली़