परभणीतील घटना : अपंग बालकास फेकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 00:30 IST2017-12-11T00:29:51+5:302017-12-11T00:30:01+5:30
शहरातील ज्ञानेश्वरनगर भागात १० डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास तीन वर्षीय कुपोषित व अपंग बालक फेकून दिलेल्या अवस्थेत आढळून आले़

परभणीतील घटना : अपंग बालकास फेकले
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील ज्ञानेश्वरनगर भागात १० डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास तीन वर्षीय कुपोषित व अपंग बालक फेकून दिलेल्या अवस्थेत आढळून आले़
परभणी शहरातील ज्ञानेश्वर नगरातील एमएसईबीसीच्या संरक्षक भिंतीजवळ गुलाबी रंगाच्या कपड्यामध्ये एक बालक असल्याची माहिती चाईल्ड लाईनच्या पथकाला मिळाली़ त्यावरून चाईल्ड लाईनचे केंद्र समन्वयक संदीप बेंडसुरे व त्यांच्या पथकाने घटनास्थळ गाठले़ या ठिकाणी गुलाबी रंगाच्या कपड्यामध्ये एक तीन वर्षीय अपंग व कुपोषित बालक असल्याचे आढळून आले़ त्यानंतर केंद्र समन्वयक संदीप बेंडसुरे यांनी कोतवाली पोलीस ठाण्याशी संपर्क साधला़
बीट जमादार जंत्रे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला़ बालकास जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू झाले आहेत़
दरम्यान, या प्रकरणी संदीप बेंडसुरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरूद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे़ एएसआय जंत्रे तपास करीत आहेत़