परभणी : सोयीच्या कंत्राटदाराला कामाची खिरापत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 12:03 AM2019-12-17T00:03:36+5:302019-12-17T00:04:18+5:30

येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परिसर स्वच्छतेचे काम करण्यासाठी कंत्राटी पद्धतीवर मजूर लावण्याच्या १५ लाख २१ हजार ५९० रुपयांच्या कामाच्या निविदेच्या व्यापारी लिफाफ्यात ७ पैकी ६ कंत्राटदार अपात्र ठरल्याने संबंधित समितीने या कामाची निविदा प्रक्रियाच रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतरही विशिष्ट अधिकाऱ्यांच्या निर्णयाने मर्जीतील कंत्राटदाराला कामाची खिरापत वाटप केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Parbhani: Hiring a contractor for work | परभणी : सोयीच्या कंत्राटदाराला कामाची खिरापत

परभणी : सोयीच्या कंत्राटदाराला कामाची खिरापत

Next

अभिमन्यू कांबळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परिसर स्वच्छतेचे काम करण्यासाठी कंत्राटी पद्धतीवर मजूर लावण्याच्या १५ लाख २१ हजार ५९० रुपयांच्या कामाच्या निविदेच्या व्यापारी लिफाफ्यात ७ पैकी ६ कंत्राटदार अपात्र ठरल्याने संबंधित समितीने या कामाची निविदा प्रक्रियाच रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतरही विशिष्ट अधिकाऱ्यांच्या निर्णयाने मर्जीतील कंत्राटदाराला कामाची खिरापत वाटप केल्याचा प्रकार समोर आला आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठातील परिसर क्रमांक १, २ व ३ मधील निवासस्थाने, कार्यालये, वसतिगृहे व महाविद्यालये या परिसरातील गवत काढून स्वच्छता करण्याच्या कामासाठी कंत्राटी पद्धतीवर मजूर पुरविण्याकरिता १५ लाख २१ हजार ५९० रुपयांच्या कामाची निविदा काढण्यात आली होती. १२ महिन्यांच्या करार तत्त्वानुसार हे काम करावयाचे आहे. ३० जुलै रोजी या संदर्भातील निविदा प्रसिद्ध झाली. त्यानंतर ७ निविदा कृषी विद्यापीठाकडे दाखल झाल्या. २८ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता या निविदांचे लिफाफे उघडण्यात आले. त्यामध्ये हरिओम मल्टीसर्व्हिसेस या कंत्राटदाराने अंदाजपत्रकापेक्षा १५ टक्के कमी दराने तर भास्कर व्ही. गोडबोले या कंत्राटदाराने १४.४५ टक्के कमी दराने, रामराव माधव लव्हारे या कंत्राटदाराने अंदाजपत्रकापेक्षा १०.३० टक्के दराने तर संकल्प सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेने अंदाजपत्रक दराने निविदा दाखल केली. स्वाभिमानी सुशिक्षित बेरोजगार सेवा संस्थेने अंदाजपत्रकापेक्षा १०.१० टक्के कमी दराने, स्वरा हाऊस किपिंग अ‍ॅण्ड सेक्युरिटी सर्व्हिसेस या संस्थेने अंदाजपत्रकापेक्षा २१.१० टक्के कमी दराने निविदा दाखल केली. तर मे.यश मल्टीसर्व्हिसेस या संस्थेने दाखल केलेली निविदा व्यवसाय प्रमाणपत्र न जोडल्याने अपात्र ठरविण्यात आली. उर्वरित सहा निविदा तांत्रिक लिफाफ्यात पात्र ठरल्या. त्यानंतर व्यापारी लिफाफ्यामध्ये केवळ भास्कर व्ही. गोडबोले यांचीच निविदा पात्र ठरल्याचे सांगण्यात आले. उर्वरित ५ निविदा अपात्र ठरल्या. त्यामुळे सदरील कामाची निविदा रद्द करुन फेरनिविदा मागविण्यात याव्यात, असा निर्णय कृषी विद्यापीठातील तत्कालीन अभियंता अशोक कडाळे, संचालन संशोधक यांचे प्रतिनिधी के.एन.सुभेदार, कुलसचिव कार्यालयाचे कक्ष अधिकारी एन.बी.खरतडे, सहनियंत्रक एस.ए. हिवराळे, उपअभियंता डी.डी. टेकाळे, कक्ष अधिकारी आर.एस. खरवडे, विद्युत विभागाचे प्रतिनिधी ए.एम. माने, एम.जे. नीलवर्ण आणि भांडारपाल एस.एस.धनशेट्टी या १० जणांच्या समितीने २८ आॅगस्ट रोजी झालेल्या बैठकीत घेतला. तशी प्रोसेडिंगही पूर्ण करण्यात आली. १६ सप्टेंबर रोजी विद्यापीठ अभियंता, उपअभियंता व भांडारपाल यांच्या स्वाक्षरीने तशी कार्यालयीन टिपणी मंजूर करुन सर्व दरपत्रके व निविदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे फेरनिविदा प्रक्रिया होणे अपेक्षित असताना अतिवृष्टी व चक्रीवादळ (!) यामुळे गवताचे प्रमाण वाढल्याचा व त्यामुळे सरपटनारे प्राणी आणि डासांचे प्रमाण वाढल्याचा साक्षात्कार विद्यापीठकातील काही अधिकाऱ्यांना झाला. तशी स्वच्छतेची मागणी शिक्षण संचालकांकडे करण्यात आली. त्यानुसार उपलब्ध निविदा प्रक्रियेतील बाबीवर फेरविचार करण्यासाठी ४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता समितीची बैठक बोलावण्यात आली; परंतु, काही तांत्रिक अडचणीमुळे (कोणत्या तांत्रिक अडचणी हे प्रोसेडिंगमध्ये नमूद केले नाहीत) ही बैठक रद्द करण्यात आली. त्यानंतर ६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत २ नोव्हेंबर रोजी कंत्राटदार भास्कर गोडबोले यांनी संबंधित समितीस पत्र देऊन साफसफाईच्या कंत्राटाचा कार्यारंभ आदेश देऊन काम करण्यास संधी देण्याची मागणी करण्यात आलेला अर्ज समितीसमोर ठेवण्यात आला. समितीच्या सदस्यांनीही उदार मनाने कंत्राटदार गोडबोले यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर अंदाजपत्रकापेक्षा २१.१० टक्के कमी दरात गोडबोले यांच्यापेक्षा इतर कंत्राटदार कसे तयार झाले? या अनुषंगाने विद्यापीठाचा फायदा करुन देण्यासाठी गोडबोले यांना आणखी अंदाजपत्रकाच्या दरात बदल करण्याची मागणी करण्याऐवजी सदरील कंत्राटावर काम करणाºया कामगारांना मजुरी कशी देणार, याच्यावर चर्चा केली गेली. याच समितीतील सहाय्यक नियंत्रक एस.ए.हिवराळे व अभियंता अशोक कडाळे यांनी व्यापारी लिफाफ्यात पात्र ठरलेले कंत्राटदार यांना कार्यारंभ आदेश देणे योग्य वाटते, असा शेरा देऊन फेर निविदा काढणे योग्य वाटत नाही, असा शेरा मारलेली टिप्पणी समितीला सादर केली. समितीनेही मोठ्या मनाने या अधिकाºयांची टिप्पणी मंजूर केली. यापूर्वी २९ आॅगस्ट रोजी झालेल्या बैठकीत या दोन अधिकाºयांनी फेरनिविदा काढण्याचा निर्णय कसा घेतला होता, याची विचारणा न करता त्यांची टिप्पणी प्रमाण माणून कंत्राटदार भास्कर गोडबोले यांना ८ नोव्हेंबर रोजी विद्यापीठ अभियंता व उपअभियंत्यांच्या स्वाक्षरीने कार्यारंभ आदेश देण्यात आला. त्यामुळे १० जणांच्या समितीवर दोनच अधिकारी भारी ठरल्याचा प्रकार या निमित्ताने समोर आला आहे.
निविदेसाठी : स्पर्धा का होऊ दिली गेली नाही?
४कोणत्याही शासकीय कामाच्या निविदा मंजूर करीत असताना अंदाजपत्रक दरापेक्षा अधिकाधिक कमी दरात जो कंत्राटदार दरपत्रक सादर करेल, त्याला सदरील काम मंजूर करुन प्रशासनाचा फायदा करण्याचा पवित्रा नेहमीच अधिकारी घेत असतात. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अधिकाºयांना मात्र अशी स्पर्धा व्हावी, असे वाटले नाही.
४एकच निविदा पात्र ठरल्यानंतर सहाजिकच स्पर्धा नाही. त्यामुळे नव्याने प्रक्रिया होणे ही नियमित बाब आहे; परंतु, या झंझटमध्ये न पडता संबंधित कंत्राटदाराला दरामध्ये घासाघीस न करता काम देण्याचा उदार निर्णय या विद्यापीठाच्या अधिकाºयांनी घेतला.
४त्यांची ही उदारता विद्यापीठाला आर्थिकदृष्ट्या नुकसानीत घेऊन जाणारी ठरली, याचे मात्र संबंधितांना काहीही घेणे-देणे दिसले नाही. त्यामुळेच विद्यापीठाचा फायदा बघण्याऐवजी एकमेव कंत्राटदारालाच कार्यारंभ आदेश देण्यात येथील अधिकाºयांनी धन्यता मानल्याचे पाहावयास मिळाले.

Web Title: Parbhani: Hiring a contractor for work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.