परभणी- गंगाखेड रस्त्याला गेले तडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:17 IST2021-03-27T04:17:39+5:302021-03-27T04:17:39+5:30
रिक्त पदांमुळे आरोग्य सेवा कोलमडली सोनपेठ : खिळखिळ्या झालेल्या तालुक्यातील आरोग्य यंत्रणेसमोर अनेक आव्हाने आहेत. मात्र, या यंत्रणेला सक्षम ...

परभणी- गंगाखेड रस्त्याला गेले तडे
रिक्त पदांमुळे आरोग्य सेवा कोलमडली
सोनपेठ : खिळखिळ्या झालेल्या तालुक्यातील आरोग्य यंत्रणेसमोर अनेक आव्हाने आहेत. मात्र, या यंत्रणेला सक्षम करण्यासाठी आतापर्यंत फारसे प्रयत्न झाले नाहीत. कोरोनाच्या संकटाने या यंत्रणेचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे डोकेदुखी ठरत आहेत.
हिरकणी कक्ष गायब
परभणी : येथील बसस्थानकाचे रूपांतर बसपोर्टमध्ये होत असल्याने तात्पुरते शेड उभारून परभणी आगाराचा कारभार सुरू आहे. मात्र, स्थानकावर येणाऱ्या महिला प्रवाशांना त्यांच्या बाळांना योग्य प्रमाणात स्तनपान करता यावे, यासाठी हिरकणी कक्ष उभारण्याचे आदेश आहेत. मात्र, परभणी शहरातील बसस्थानकात हिरकणी कक्ष गायब आहे.
पशुवैद्यकीय दवाखान्यास इमारत
बोरी : जिंतूर तालुक्यातील बोरी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नवीन इमारतीसाठी १४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे या दवाखान्याचा लवकरच कायापालट होणार आहे. त्यामुळे पशुपालकांना दिलासा मिळत आहे.
निराधारांची ससेहोलपट सुरूच
मानवत : विविध योजनांचा लाभ घेऊन आपला उदरनिर्वाह भागविणाऱ्या तालुक्यातील निराधार योजनेतील लाभार्थ्यांची ससेहोलपट सुरूच आहे. लाभार्थ्यांकडून हयात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी चकरा सुरू आहेत.
कर्मचाऱ्यांकडून ड्रेस कोडला खो
जिंतूर : शासनाने ठरवून दिलेला ड्रेस कोड न वापरता रंगीबेरंगी कपडे परिधान करून शासकीय कार्यालयात कामकाजावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. अशा कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई होत नसल्याने ड्रेस कोडची संकल्पना गुंडाळली जात आहे.
वाळूमाफियांचा धुमाकूळ सुरूच
गंगाखेड : बहुतांश धक्क्याचा लिलाव झाला नसल्याने विना परवाना चोरून वाळूचा उपसा करण्यासाठी वाळू माफियांनी गोदावरी नदीपात्रात धुमाकूळ घातल्याचे चित्र जागोजागी दिसून येत आहे.
महागाईने नागरिक हैराण
पालम : मागील दोन महिन्यांपासून सततच्या बाजारपेठेतील दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडल्याने गरिबांच्या घरातील फोडणी बंद होण्याची वेळ आली आहे.
खंडित वीज पुरवठ्याने शेतकरी त्रस्त
सोनपेठ : वीज वितरण कंपनीच्या वतीने वीज बिल वसुलीच्या नावाखाली अनेक कृषिपंपाच्या रोहित्रावरील वीज पुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उन्हाळी पिकांना सिंचन करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पूर्णा शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था
पूर्णा : शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
सिंचन विहिरीच्या कामांकडे फिरवली पाठ
पूर्णा : तालुक्यातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर व्हावी, यासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत सार्वजनिक सिंचन विहिरीची कामे सुरू करण्यात आली आहेत. मात्र, वेळेवर मजुरांना मजुरी व बांधकाम केलेली कुशल देयक मिळत नसल्याने या कामाकडे ग्रामपंचायतींनी पाठ फिरवली आहे.