परभणी :जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणात झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 23:16 IST2019-07-20T23:14:12+5:302019-07-20T23:16:12+5:30
येथील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीत गैरप्रकार झाल्या प्रकरणी चौकशीसाठी समाजकल्याण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे शनिवारी परभणीत आले होते. यावेळी त्यांनी या विभागाशी संबंधितांना केलेल्या प्रश्नांमुळे अधिकारी घामाघूम झाल्याचे पहावयास मिळाले.

परभणी :जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणात झाडाझडती
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीत गैरप्रकार झाल्या प्रकरणी चौकशीसाठी समाजकल्याण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे शनिवारी परभणीत आले होते. यावेळी त्यांनी या विभागाशी संबंधितांना केलेल्या प्रश्नांमुळे अधिकारी घामाघूम झाल्याचे पहावयास मिळाले.
परभणी येथील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप विधिमंडळ अधिवेशनात करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली होती. त्या अनुषंगाने समाजकल्याण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे चौकशीसाठी शनिवारी परभणी दौºयावर आले होते. सकाळपासूनच त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संबंधित विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांची सुनावणी सुरु केली. यावेळी ६ तक्रारदारांनाही बोलाविण्यात आले होते. शिवाय अन्य दोन तक्रारदारही आले होते. तसेच जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या तीन अध्यक्षांना पाचारण करण्यात आले होते.
यावेळी आरोपाचा ठपका असलेल्या उपायुक्त वंदना कोचुरे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुपारी १२ वाजेच्या सुमारास सुरु झालेली ही सुनावणी सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत चालली. सर्व बाजूंचे म्हणणे वाघमारे यांनी ऐकून घेतल्यानंतर ते आपला अहवाल शासनाला सादर करणार आहेत.