Parbhani: Congress's Anita Sonkamble as mayor | परभणी : महापौरपदी काँग्रेसच्या अनिता सोनकांबळे
परभणी : महापौरपदी काँग्रेसच्या अनिता सोनकांबळे

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील महानगरपालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या अनिता रविंद्र सोनकांबळे या विजयी झाल्या असून त्यांनी भाजपाच्या उमेदवार मंगला मुद्गलकर यांचा २९ मतांनी पराभव केला. उपमहापौरपदी काँग्रेसचे भगवान वाघमारे विजयी झाले आहेत.
परभणी महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौरपदाची शुक्रवारी निवडणूक घेण्यात आली. परभणीचे महापौरपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव असून या पदासाठी काँग्रेसकडून अनिता रविंद्र सोनकांबळे यांचा तर भाजपाकडून मंगला मुद्गलकर यांचा अर्ज कायम राहिला. महापौरपदासाठी अर्ज दाखल केलेल्या राष्ट्रवादीच्या डॉ.वर्षा खिल्लारे व गवळण रोडे यांनी अर्ज परत घेतले. त्यामुळे सोनकांबळे व मुद्गलकर यांच्यात थेट लढत झाली. यावेळी हात उंचावून घेतलेल्या मतदानात सोनकांबळे यांना ३७ तर मुद्गलकर यांना ८ मते मिळाली. १४ सदस्य तटस्थ राहिले. ६ सदस्य सभागृहात गैरहजर राहिले. त्यामुळे पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी काँग्रेसच्या अनिता सोनकांबळे यांना विजयी घोषित केले. त्यानंतर उपमहापौरपदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी यापदासाठी उमेदवारी दाखल केलेले राष्ट्रवादीचे अलीखान, स.मेहबुब अली पाशा, काँग्रेसचे महेमुद खान यांनी आपले अर्ज परत घेतले. त्यामुळे काँग्रेसचे भगवान वाघमारे आणि भाजपाचे मोकिंद खिल्लारे यांच्यात लढत झाली. यावेळी मतदानात वाघमारे यांना ३७ तर खिल्लारे यांना ८ मते मिळाली. १५ सदस्य तटस्थ राहिले. ५ सदस्य सभागृहात गैरहजर होते. पीठासन अधिकारी पी. शिव शंकर यांनी वाघमारे यांना विजयी घोषित केले. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने नवनिर्वाचित महापौर अनिता सोनकांबळे व उपमहापौर भगवान वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आयुक्त रमेश पवार, नगरसचिव विकास रत्नपारखी आदींची उपस्थिती होती. निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी, काँग्रेसचे माजी आ.सुरेश देशमुख आदींनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.
यावेळी मावळत्या महापौर मीनाताई वरपूडकर, उपमहापौर माजूलाला, रविराज देशमुख, सिद्धार्थ हत्तीअंबिरे, समशेर वरपूडकर, नगरसेवक इम्रानलाला, सचिन देशमुख, नगरसेविका जयश्री खोबे, नदीम इनामदार, रविंद्र सोनकांबळे आदींची उपस्थिती होती. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ .सुरेश वरपूडकर हे पक्षाच्या बैठकीसाठी मुंबईला गेल्याने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी हे सभागृह परिसरात सकाळी ११ वाजेपासून ठाण मांडून होते. निवडीची प्रक्रिया झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी सभागृहाबाहेर जल्लोष साजरा केला. त्यानंतर नवनिर्वाचित महापौर, उपमहापौरांची कार्यकत्यांनी विजयी मिरवणूक काढली.
राष्ट्रवादी काँग्रेस : शिवसेनेचे सदस्य तटस्थ
४या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांनी महापौरपदासाठी तर २ नगरसेवकांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केले होते. शुक्रवारी त्यांनी सर्व अर्ज परत घेतले. पक्षाच्या गटनेत्यांनी या निवडणुकीत तटस्थ राहण्याचा व्हीप काढला होता. सभागृहातील राष्ट्रवादीचे १९ पैकी ७ नगरसेवक काँग्रेसला जावून मिळाले.
४ तर १२ नगरसेवकांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. शिवसेनेचे ४ नगरसेवक तटस्थ राहिले. १ नगरसेवक गैरहजर राहिला. सभागृहात महापौरपदाच्या निवडणुकीच्या वेळी ६ तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीच्या वेळी ५ सदस्य गैरहजर होते.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अपेक्षेप्रमाणे फूट
४राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाल्याची बाब अनेक महिन्यांपासून समोर आली आहे. शुक्रवारच्या निवडणुकीत यावर शिक्कामोर्तब झाले. राष्ट्रवादीच्या एका गटातील ७ सदस्यांनी काँग्रेस सोबत जाणे पसंद केले तर उर्वरित १२ सदस्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. त्यामुळे आगामी काळात मनपा सभागृहात राष्ट्रवादीचे पुन्हा दोन गट कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहराची नवीन पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास आली आहे. काही दिवसांमध्ये या योजनेद्वारे शहरवासियांना पाणीपुरवठा सुरु केला जाणार आहे. शहरवासियांना दररोज पाणी मिळावे, यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार असून स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबविणार आहे. स्वच्छ परभणी, सुंदर परभणी हा संकल्प केला असून भूमिगत गटार योजनाही शहरात करण्याचा मानस आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर आणि परभणी शहरवासियांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्याचा प्रयत्न करणार आहे.
-अनिता सोनकांबळे, महापौर, परभणी महापालिका

महानगरपालिकेच्या वतीने शहरात सुरु असलेली विकासकामे पूर्ण करुन नवीन विकासकामे आणण्यासाठी पुरेपुर प्रयत्न करणार आहे. सभागृहातील सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन विकासाचे राजकारण करण्याचा आपला मानस आहे. राज्यात महाविकासआघाडीचे सरकार येणार असल्याने अनेक नवीन योजना आणण्याचे नियोजन आगामी काळात करण्यात येईल. स्वच्छता अभियानात पुन्हा एकदा मनपाला पारितोषिक मिळावे, यासाठी प्रयत्न करून या मोहिमेत सातत्य ठेवणार आहे. शिवाय मनपातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार आहे.
-भगवान वाघमारे, उपमहापौर, परभणी महापालिका

राज्यात काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी आहे. जिल्ह्यातही ही आघाडी आणखी घट्ट झाली आहे. काँग्रेस- राष्ट्रवादीने नेहमीच विकासाला प्राधान्य दिले असून सर्वसामान्य नागरिकांची मनपातील विकासकामे सुकर व्हावीत, या अनुषंगाने मनपात काँग्रेस- राष्ट्रवादी काम करणार आहे. शहरात नवनवीन प्रकल्प आणत असताना जुन्या प्रकल्पांची कामेही वेगाने पूर्ण करण्यास प्राधान्य राहणार आहे. समान कार्यक्रमावर आधारित अजेंडा मनपात राबविला जाणार आहे.
-आ.बाबाजानी दुर्राणी, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

Web Title: Parbhani: Congress's Anita Sonkamble as mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.