परभणी जिल्हाधिकारी कार्यालय :९ लाख दस्तऐवजांचे स्कॅनिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 12:29 AM2018-04-10T00:29:30+5:302018-04-10T00:29:30+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व व्यवहार पेपरलेस करण्यासाठी मागील काही दिवसांपासून जुन्या दस्ताऐवजांचे स्कॅनिंग करण्याचे काम सुरू झाले आहे़ ५ महिन्यांमध्ये ८ लाख ८८ हजार ७६ दस्ताऐवजांचे स्कॅनिंग पूर्ण झाले असून, सर्व दस्ताऐवज स्कॅन करण्यासाठी साधारणत: एक वर्षाचा कालावधी लागणार आहे़

Parbhani Collector Office: 9 lakhs scanning of documents | परभणी जिल्हाधिकारी कार्यालय :९ लाख दस्तऐवजांचे स्कॅनिंग

परभणी जिल्हाधिकारी कार्यालय :९ लाख दस्तऐवजांचे स्कॅनिंग

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व व्यवहार पेपरलेस करण्यासाठी मागील काही दिवसांपासून जुन्या दस्ताऐवजांचे स्कॅनिंग करण्याचे काम सुरू झाले आहे़ ५ महिन्यांमध्ये ८ लाख ८८ हजार ७६ दस्ताऐवजांचे स्कॅनिंग पूर्ण झाले असून, सर्व दस्ताऐवज स्कॅन करण्यासाठी साधारणत: एक वर्षाचा कालावधी लागणार आहे़
शासकीय कार्यालयांमध्ये सर्व व्यवहार आॅनलाईन करण्याची प्रक्रिया मागील काही दिवसांपासून सुरू झाली आहे़ या अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयांमधून दिली जाणारी वेगवेगळी प्रमाणपत्रे आता आॅनलाईन उपलब्ध झाली आहेत़ त्यात सातबारा, हॉल्डींग या प्रमुख प्रमाणपत्रांबरोबरच जातीची प्रमाणपत्रेही आॅनलाईन दिली जात आहेत़ त्यामुळे नागरिकांच्या वेळेत बचत होत असून, प्रमाणपत्रांसाठी नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयात येण्याची गरज भासणार नाही. जिल्हा कचेरीतील संपूर्ण व्यवहार आॅनलाईन आणि पेपरलेस करण्याचे धोरण आखण्यात आले आहे़ त्यानुसार नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अभिलेखे संगणीकृत करण्याचे काम नोव्हेंबर २०१७ मध्ये हाती घेण्यात आले आहे़ यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला असून, त्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयातील अभिलेख्यांचे स्कॅनिंग केले जात आहे़
जिल्हा कचेरीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण अभिलेखे उपलब्ध आहेत़ निजामकाळापासूनचे हे अभिलेखे रेकॉर्ड रुममध्ये जतन करून ठेवण्यात आले आहेत़ त्यामुळे अनेक अभिलेखे जीर्ण अवस्थेत आहेत़ या अभिलेख्यांचे आयुष्यमान वाढविण्यासाठीही योजनेचा लाभ होणार आहे़ जिल्हाधिकारी कार्यालयात विविध २३ विभाग कार्यरत आहेत़ त्यात विशेष भूसंपादन, भूसुधार, आस्थापना इ. विभागांचा समावेश आहे़ या विभागांमध्ये जमीन संपादनाची कागदपत्रे, कुळ जमिनी संदर्भातील कागदपत्रे, अकृषिकची प्रमाणपत्रे, निजाम काळातील ऊर्दू अभिलेखे उपलब्ध आहेत़ एकूण २५ लाख ५३ हजार ९५३ अभिलेखे असून, या सर्व अभिलेख्यांचे स्कॅनिंगचे काम सुरू झाले आहे़ हे काम पूर्ण झाल्यानंतर आवश्यक असलेले जुने अभिलेखे एका क्लिकवर मिळणार आहेत़
जिल्हा कचेरीतील अभिलेख्यांचे संगणकीकरण झाल्यास शेतकऱ्यांना अनेक प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी महसूल प्रशासनाकडे चकरा माराव्या लागतात़ हे काम पूर्ण झाल्यानंतर जुनी आणि महत्त्वपूर्ण असलेली कागदपत्रे नागरिकांना उपलब्ध होणार असल्याने मोठी गैरसोय दूर होणार आहे़
कामे होणार सोपी
रेकॉर्ड रुममध्ये जुन्या अभिलेख्यांचे जतन करून ठेवले असून, ही अभिलेखे शोधण्यासाठी मात्र अधिकारी, कर्मचाºयांना बराच वेळ खर्ची घालावा लागत असे़ अनेक वेळा अभिलेखे उपलब्ध असतानाही ती सापडत नसल्याने कामे रखडत होती़ अभिलेख्यांच्या संगणकीकरणानंतर मात्र कोणताही दस्ताऐवज एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे़ संपूर्ण दस्ताऐवजांचे संगणकीकरण झाल्यानंतर स्वतंत्र सॉफ्टवेअरमध्ये हे दस्ताऐवज समाविष्ट केले जातील़ त्यामुळे विभागनिहाय, विषयनिहाय, माहितीनिहाय अशा स्वरुपात हे दस्ताऐवज शोधणे सोपे होणार आहे़
फसली १३५२ पासूनचे अभिलेखे
जिल्हाधिकारी कार्यालयातील रेकॉर्ड रुममध्ये निजामकाळातील फसली १३५२ पासूनचे अभिलेखे उपलब्ध आहेत़ काही वर्षापूर्वी या रेकॉर्ड रुमचे नूतनीकरणही करण्यात आले होते़ त्यामुळे जुन्या अभिलेख्यांची व्यवस्थित मांडणी करण्यात आली आहे़ यामध्ये निजाम काळातील मशीद, दर्गा, मठ आदींची महत्त्वाची कागदपत्रे, कूळ जमिनीबाबतच्या कागदपत्रांचा समावेश आहे़ तसेच ऊर्दू अभिलेखेही उपलब्ध असून, ही सर्व अभिलेखे आता आॅनलाईन मिळणार आहेत़

Web Title: Parbhani Collector Office: 9 lakhs scanning of documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.