परभणी :विधान परिषद निवडणुकीची जिल्ह्यात आचारसंहिता लागू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:06 IST2018-04-21T00:06:22+5:302018-04-21T00:06:22+5:30
निवडणूक आयोगाने विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम शुक्रवारी जाहीर केला असून, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे़ या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापणार आहे़

परभणी :विधान परिषद निवडणुकीची जिल्ह्यात आचारसंहिता लागू
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : निवडणूक आयोगाने विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम शुक्रवारी जाहीर केला असून, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे़ या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापणार आहे़
भारत निर्वाचन आयोगाने २० एप्रिल रोजी राज्यातील सहा विधान परिषद मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम शुक्रवारी जाहीर केला आहे़ परभणी आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांचा एक मतदार संघ असून, या स्थानिक संस्था मतदार संघातून एक सदस्य विधान परिषदेवर निवडून द्यावयाचा आहे़ सध्या आ़ बाबाजानी दुर्राणी हे या मतदार संघाचे सदस्य आहेत़ २१ जून रोजी त्यांचा कार्यकाळ संपतो़ त्यापूर्वीच निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे़ त्यानुसार परभणी आणि हिंगोली या दोन्ही जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागू झाली आहे़ घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार २६ एप्रिल रोजी अधिसूचना जाहीर केली जाणार असून, ३ मे ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतीम तारीख आहे़ ४ मे रोजी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे़ ७ मे ही अर्ज मागे घेण्याची अंतीम तारीख असून, २१ मे रोजी प्रत्यक्ष मतदान घेतले जाणार आहे़
२४ मे रोजी मत मोजणी होणार आहे़ विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने जिल्ह्यात आता या जागेसाठी राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात होणार आहे़
५०२ मतदार बजावणार हक्क
परभणी-हिंगोली या मतदार संघात एकूण ५०२ मतदार असून, सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे़ मतदार संघातील मतदारांचे पक्षीय बलाबल पाहता काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचेच वर्चस्व आहे़ या मतदार संघावर वर्चस्व मिळविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असून, येत्या काळात या निमित्ताने निवडणुकीचे वातावरण तापणार आहे़