Parbhani: 5.5% of the vote | परभणी : ६६.२७ टक्के मतदान

परभणी : ६६.२७ टक्के मतदान

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत सरासरी ६६.२७ टक्के मतदान झाले. सर्वाधिक म्हणजे तब्बल ७२ टक्के मतदान जिंतूर विधानसभा मतदारसंघात झाले.
परभणी विधानसभा मतदारसंघात सरासरी ६०.९२ टक्के मतदान झाले. २०१४ च्या तुलनेत मतदारसंघातील आकडेवारी घसरली आहे. गेल्यावेळी येथे ६४.२० टक्के मतदान झाले होते. परभणी शहरातील अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. परभणी ते मानवत रोड रेल्वेमार्गावरील मोहपुरी शिवारातील रेल्वेखाली पाणी साचल्याने मोहपुरी व गव्हा येथील नागरिकांना मतदानासाठी पान्हेरा येते जाताना अडचण आली.
जिंतूर विधानसभा मतदारसंघात मतदानाचे रेकॉर्ड झाले. २०१४ मध्ये या मतदारसंघात ६८.३२ टक्के मतदान झाले होते. २०१९ मध्ये तब्बल ७२ टक्के मतदान झाले. जिल्ह्यात चार मतदारसंघाच्या तुलनेत या मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले आहे. पाथरी विधानसभा मतदारसंघात सरासरी ६८.५० टक्के मतदान झाले. २०१४ मध्ये या मतदारसंघात ६६.४८ टक्के मतदान झाले होते. येथे मतदानाचा टक्का वाढल्याचे पाहावयास मिळाले. या मतदारसंघातील पाथरी, मानवत, सोनपेठ शहरांसह ग्रामीण भागातील मतदान केंद्रावरही मतदारांच्या रांगा पाहावयास मिळाल्या. सोनपेठ तालुक्यातील गोदावरील काठावरील लासीना, थडी उक्कडगाव, वाडी पिंपळगाव, थडी पिंपळगाव, गंगा पिंपरी, गोळेगाव या गावांनी रस्त्याच्या मागणीसाठी मतदानावर बहिष्कार टाकला. गंगाखेड विधानसभा मतदारसंघात ६३.२९ टक्के मतदान झाले. या मतदारसंघात २०१४ मध्ये ६३.५७ टक्के मतदान झाले होते. या मतदारसंघातील बनवस, सिरसम, नाव्हा, पांगरी लासीना या गावांमधील मतदान केंद्रासमोर सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत मतदान चालले. सायंकाळी ६ पूर्वी हे सर्व मतदार केंद्रामध्ये दाखल झाले होते. त्यामुळे त्यांना टोकन देण्यात आले. त्यानंतर त्यांनी मतदान केले. दरम्यान, मतदारांनी अर्ज केला नसतानाही त्यांची नावे टपाली मतपत्रिकेच्या यादीत आल्याचा प्रकार परभणी व गंगाखेडमध्ये पहावयास मिळाला. यावरुन मतदार व अधिकाऱ्यांमध्ये वादावादी झाली.

Web Title: Parbhani: 5.5% of the vote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.