Parbhani: 5 dengue cases in one and a half months | परभणी : दीड महिन्यांत ७० डेंग्यू संश्यित
परभणी : दीड महिन्यांत ७० डेंग्यू संश्यित

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : महानगरपालिकेच्या नागरी हिवताप विभागाने दीड महिन्याच्या काळात केलेल्या सर्वेक्षणात डेंग्यू संशयित तापीने ग्रासलेल्या ७० रुग्णांची माहिती प्राप्त झाली असून, या परिसरातील एकूण १५३ जणांचे रक्तजल नमुने सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी पाठविले होते. त्यातील एका रुग्णास डेंग्यूची लागण झाल्याचा अहवाल मनपाला प्राप्त झाला आहे.
परभणी शहर व परिसरात तापीची साथ पसरल्याने महानगरपालिकेच्या नागरी हिवताप योजनेअंतर्गत शहरात २३ आॅगस्ट ते १६ आॅक्टोबर या दीड महिन्यांच्या काळात सर्वेक्षण करण्यात आले. घरोघरी जाऊन कंटेनरची तपासणी करण्यात आली. त्यात एकूण ३ हजार ९८३ घरांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ३१७ घरे दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे ठिकठिकाणी तपासलेल्या ३ हजार ४११ कंटनेरपैकी ३४७ कंटेनर दूषित असल्याची माहिती नागरी हिवताप योजना कार्यालयातील जीवशास्त्रज्ञ विनय मोहरीर यांनी दिली.
दूषित असलेल्या ३४७ कंटेनरपैकी ३०८ कंटेनरमध्ये डास अळीनाशक औषधी टाकण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ३९ कंटेनरमधील पाणी काढून देण्यात आले. ३०२ घरांमध्ये व परिसरात धूर फवारणी करण्यात आली. २८ आॅगस्ट ते ५ आॅक्टोबर या काळात शहरातील १६ प्रभागांमध्ये धूर फवारणीची पहिली फेरी पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती मनपाने दिली.

Web Title: Parbhani: 5 dengue cases in one and a half months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.