Parbhani: 2 crore uninsured for drug purchase | परभणी : औषधी खरेदीचे १ कोटी अखर्चित

परभणी : औषधी खरेदीचे १ कोटी अखर्चित

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयात एकीकडे रुग्णांसाठी औषधी उपलब्ध नसताना यासाठी जिल्हा नियोजन समितीने दिलेला ९८ लाख १४ हजार रुपयांचा निधीच खर्च झाला नसल्याची बाब समोर आली आहे. अधिकाऱ्यांच्या या दुर्लक्षपणाचा त्रास मात्र सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या वतीने जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांसाठी औषधी, साधन सामुग्री व यंत्र सामुग्रीसाठी २०१९-२० या वर्षाकरीता ६४ लाख ५० हजार रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. त्यातील ३८ लाख १४ हजार रुपये जिल्हा आरोग्य कार्यालायकडे वितरित करण्यात आले होते. डिसेंबर अखेर त्यातील रुपयाही या कार्यालयाने खर्च केलेला नाही. या शिवाय जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयाकरीता औषधी, साधन सामुग्री व यंत्र सामुग्रीकरीता ६० लाख रुपयांची तरतूद जिल्हा नियोजन समितीच्या आराखड्यात मंजूर करण्यात आली होती. त्यातील ३६ लाख रुपये जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाला जिल्हा नियोजन समितीने वितरित केले होते. या कार्यालयाने डिसेंबर अखेर यातील एक दमडीही खर्च केली नाही. याच कार्यालयाला उपजिल्हा रुग्णालयाकरीता औषधी खरेदी, साधन सामुग्री व यंत्र खरेदीकरीता ४० लाख रुपयांची तरतूद मंजूर करण्यात आली होती. त्यातील २४ लाख रुपये या कार्यालयास वितरित करण्यात आले. यातीलही निधी खर्च करण्यास या विभागाला अपयश आले. त्यामुळे एकीकडे रुग्णांना प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयस्तरावर औषधी मिळत नाहीत. त्यामुळे नाविलाजाने खाजगी दुकानांतून औषधींची खरेदी करावी लागते आणि दुसरीकडे मात्र या विभागाने एकूण ९८ लाख १४ हजार रुपयांचा निधी अखर्चित ठेवला आहे. या विभागातील अधिकाऱ्यांचा हा निष्काळजीपणा रुग्णांच्या मुळावर आला. आता या तिन्ही विभागांकरीता २०१९-२० या आर्थिक वर्षाकरीता मंजूर करण्यात आलेला एकूण १ कोटी ६४ लाख ५० हजार रुपयांचा निधी फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्यांत खर्च करावा लागणार आहे. अन्यथा मार्च अखेरीस तो निधी अखर्चित राहिल्यास तो शासनाला समर्पित करावा लागणार आहे. परिणामी रुग्णालयामध्ये उपचारासाठी येणाºया गरजुंना याचा फटका सहन करावा लागणार आहे.
नवीन वर्षात ५ कोटी ८३ लाखांची तरतूद
४२०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राकरीता औषधी, साधन सामुग्री व यंत्र सामुग्री खरेदी करण्यासाठी ९९ लाख ५० हजार रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. तर ग्रामीण रुग्णालयातील औषधी खरेदी, साधन सामुग्री व यंत्र सामुग्रीसाठी ३ कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालयाकरीता औषधी खरेदी, साधन सामुग्री व यंत्र सामुग्री खरेदीसाठी १ कोटी ८४ लाख रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. २०१९-२० या वर्षासाठी या तीन हेडअंतर्गत मंजूर झालेला ९८ लाख १४ हजार रुपयांचा निधी डिसेंबर अखेरपर्यंत आरोग्य विभागाला खर्च करता आलेला नाही. त्यामुळे पुढील वर्षात नव्याने तरतूद केलेल्या निधी खर्चाचे नियोजन या विभागाला गांभीर्याने करावे लागणार आहे.

Web Title: Parbhani: 2 crore uninsured for drug purchase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.