सोनपेठ (जि. परभणी) : भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिस हेड कॉन्स्टेबलला सरपंचासह ११ जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना सोनपेठ तालुक्यातील नैकोटा येथे रविवारी घडली. याप्रकरणी सरपंचासह १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
नारायण एकनाथराव लटपटे हे रविवारी अवैध दारूविक्रीविरोधात कारवाई करण्यासाठी सपोनि. विनोद चव्हाण यांच्यासह सहकाऱ्यांसोबत नैकोटा, अवलगाव येथे जात असताना पोनि. बोलमवाड यांनी लटपटे यांना तत्काळ नैकोटा येथे भांडण सुरू आहे, तिथे जाण्यास सांगितले. नैकोटा येथे गेले असता सरपंच अंगद कोंडीबा रेवले, जानकीराम रेवले, दत्ता रोहिदास रेवले, अशोक निवृत्ती शिनगारे, परमेश्वर रेवले, सतीश प्रल्हाद रेवले, अनिल कालिंदर, भागवत अंबादास रेवले, सतीश दगडू रेवले व इतर दोन असे वैजनाथ प्रभू जाधव यांच्या कुटुंबीयांसोबत भांडण करत होते.
यावेळी लटपटे हे भांडण सोडविण्यासाठी गेले असता सरपंच अंगद रेवले याने शिवीगाळ करून लटपटे यांच्या डोक्यात लोखंडी सळईने वार करून जखमी करत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच जानकीराम रेवले, दत्ता रेवले, सतीश रेवले, अशोक शिनगारे, परमेश्वर रेवले, भागवत रेवले, अनिल कालिंदर, सतीश रेवले यांनी मारहाण केली. दरम्यान, भांडणाचा आवाज ऐकून सपोनि. चव्हाण, पोउपनि. म्हात्रे यांनी कर्मचाऱ्यांसह धाव घेत लटपटे यांना बाजूला गेले. नारायण लटपटे यांच्या फिर्यादीवरून सरकारी कामात अडथळा, कर्तव्यापासून परावृत्त करून जिवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केल्याप्रकरणी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.