गंगाखेड (परभणी): जयकवाडी धरणातून गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने आलेल्या पुरामुळे नदीवरील पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे, १७ सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी ध्वजारोहणासाठी जाण्यास शिक्षक अडकले होते. अशा वेळी गंगाखेड तालुक्यातील खळी येथील ग्रामस्थांनी शिक्षकांसाठी ट्रॅक्टर पाठवून त्यांना सुखरूपपणे गावात आणले. ग्रामस्थांच्या या एकजुटीमुळे आणि संवेदनशीलतेमुळे ध्वजारोहण सोहळा वेळेत आणि उत्साहात पार पडला.
गोदावरी नदीत जायकवाडीतून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आल्यामुळे खळी गावाजवळील ओढ्यावर पाणी आले. यामुळे चिंचटाकळी, गवंडगाव, मैराळ सावंगी, ब्रम्हनाथवाडी आणि खळी येथील शाळांचे शिक्षक पुलाच्या पलीकडे अडकले होते. १७ सप्टेंबर हा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन असल्यामुळे ध्वजारोहण करणे आवश्यक होते, परंतु पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने शिक्षकांना नदी ओलांडणे शक्य नव्हते.
ग्रामस्थाचा मदतीचा हातशिक्षक अडकल्याची माहिती मिळताच खळी गावातील उत्तमराव पवार यांनी पुढाकार घेतला. त्यांनी तत्काळ ट्रॅक्टरची व्यवस्था केली आणि तो पुलाच्या पलीकडे पाठवला. शिक्षकांना ट्रॅक्टरमध्ये बसवून त्यांना पुलावरून सुखरूप गावाच्या बाजूला आणण्यात आले. यानंतर, सर्व शिक्षक आपापल्या शाळांवर पोहोचले आणि त्यांनी ठरल्या वेळेनुसार ध्वजारोहण सोहळा पार पाडला. गावकऱ्यांच्या या माणुसकीच्या आणि मदतीच्या भावनेमुळेच हा सोहळा कोणताही व्यत्यय न येता पार पडला.