पाथरी ( परभणी) : पोहेटाकळी शिवारातील एका संशयास्पद गोडाऊनवर कृषी विभागाच्या पथकाने सोमवारी पुन्हा धाड टाकत कारवाई केली. गोडाऊनमधील साठवलेले ३१४ बॅग खत संशयास्पद आढळून आल्याने त्याचे वेगवेगळे तीन नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. या कारवाईमुळे बोगस खत विक्री करणारे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील काही महिन्यांपासून या ठिकाणी हा धक्कादायक प्रकार सुरू असल्याचे समजते. यातून अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पाथरी शहरापासून जवळच असलेल्या पोहेटाकळी शिवारातील पोखरणी फाटा परिसरात एका गोडाऊनमध्ये संशयास्पद खत साठा केल्याची माहिती कृषी विभागास मिळाली होती. रविवारी कृषी अधिकारी गोविद कोल्हे यांनी या ठिकाणी अचानक भेट दिली. त्यावेळी इतर अधिकारी नसल्याने गोडाऊनला तातडीने सील केले होते. सोमवारी कृषी विभागाचे अधिकारी, पोलीस कर्मचारी, शासकीय पंच यांच्यासह गोडाऊन ची तपासणी करण्यात आली. प्राथमिक तपासात ३१४ गोण्या आढळून आल्या. यात काही गोण्या संशयास्पद स्वरूपाच्या आढळून आल्या असून त्या अधिकृत लेबलविना होत्या. तसेच काही खतांचे प्रकार शासकीय मंजुरीविना आढळले. या गोण्यातून तीन वेगवेगळे नमुने कृषी विभागाने घेतले असून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
कोण होत पथकात..सोमवारी कृषी विभागाने टाकलेल्या धाडीत लातूर येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील गुण नियंत्रण तंत्र अधिकारी बालाजी मुंढे, कृषी विकास अधिकारी गोविंद दहिवडे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक गोविंद काळे, पाथरी येथील कृषी अधिकारी गोविंद कोल्हे , शासकीय पंच पोलीस कर्मचारी यांचा समावेश होता,
मोठे रॅकेट असण्याची शक्यतापाथरी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर हे संशयास्पद गोडाऊन आहे. या ठिकाणी काही अधिकारी यापूर्वी जाऊन आले होते, अशीही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. येथील मोठे रॅकेट कोणाच्या आशीर्वादने सुरू होते यावर चर्चा सुरू आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. बोगस खतामुळे पेरण्या आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. खत विक्रीत होत असलेले हे प्रकार थांबवावेत आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी शेतकरी करत आहेत.
संघटित गुन्हेगारी अंतर्गत कारवाई करा ..पाथरी परिसरात बोगस खत तयार करून शेतकऱ्यांना विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस येतोय. या प्रकरणी व्यापारी, कंपनी आणि सहभागी सर्वांची चौकशी झाली पाहिजे. दोषींवर संघटित गुन्हेगारी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत.- सुनील बावळे पाटील, शेतकरी, भारसवाडा