वारकऱ्यांसह एसटीलाही पंढरीची ओढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:13 IST2021-07-18T04:13:51+5:302021-07-18T04:13:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी पंढरपूरची वारी होत नाही. याचा फटका वारकऱ्यांसह एस.टी. महामंडळाला बसला ...

वारकऱ्यांसह एसटीलाही पंढरीची ओढ
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी पंढरपूरची वारी होत नाही. याचा फटका वारकऱ्यांसह एस.टी. महामंडळाला बसला आहे. परभणी विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत येणाऱ्या ७ आगारांमधून २१ हजार ८११ प्रवाशांनी बसमधून पंढरपूर गाठले. यातून ७ आगारांना ४० लाख ६७ हजार ४६० रुपयांचे उत्पन्न मिळाले. मात्र, दोन वर्षांपासून हे उत्पन्न बुडत असल्याने महामंडळाला फटका बसला आहे.
परभणी व हिंगोली जिल्ह्यातील पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त हजारो भाविक एस.टी.ने जात असत. मात्र, मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे बससेवा व वारी बंद असल्याने एस.टी. महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला आहे.
- मुक्तेश्वर जोशी, विभाग नियंत्रक
२१ हजार प्रवाशांची नोंद
२०१९ मध्ये आषाढी यात्रेनिमित्त सात आगारांमधून २१ हजार ८११ प्रवाशांनी बसद्वारे पंढरपूर गाठले. मात्र, २०२० व २०२१ मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारी बंद असल्याने एस.टी. महामंडळाचे मोठे नुकसान झाले.
जिल्ह्यातून दरवर्षी ४० पालख्या
परभणी जिल्ह्यात वारकऱ्यांची संख्या अधिक असून, नित्यनियमाने भाविक पंधरवडी एकादशीला बस व रेल्वेने पंढरपूर गाठून विठुरायाचे दर्शन घेतात.
तर आषाढी एकादशीनिमित्त जिल्ह्याच्या विविध भागांतून जवळपास ४० पालख्या वारीसाठी रवाना होतात. या पालख्यांमध्ये हजारो भाविकांचा समावेश असतो.
आजपर्यंत एकही वारी चुकलो नाही. ३० ते ४० जणांचा गट केल्यानंतर गावातून एस.टी. बसद्वारे पंढरपूर अनेक वेळा गाठले आहे. मात्र, कोरोनामुळे वारीसाठी मुकलो आहे.
- ह.भ.प. अंबादास महाराज नवघरे
नित्यनियमाने विठुरायाच्या दर्शनासाठी पायी वारीत पंढरपूरला जायचो. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून निघणाऱ्या दिंड्या बंद झाल्या आणि दर्शनाला मुकलो.
- शंकरराव इक्कर, वारकरी