सत्याग्रह आंदोलनातून पूरग्रस्तांनी मांडल्या वेदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:23 IST2021-09-16T04:23:32+5:302021-09-16T04:23:32+5:30
सप्टेंबर महिन्यात गोदावरी, दुधना, पूर्णा, मासोळी, करपरा या नद्यांसह ओढ्याला आलेल्या पुरामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. ही पूरपरिस्थिती ...

सत्याग्रह आंदोलनातून पूरग्रस्तांनी मांडल्या वेदना
सप्टेंबर महिन्यात गोदावरी, दुधना, पूर्णा, मासोळी, करपरा या नद्यांसह ओढ्याला आलेल्या पुरामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. ही पूरपरिस्थिती गंभीर होण्याला गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळाचे प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आला. राजन क्षीरसागर, माणिक कदम यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात जिल्हाभरातील शेतकरी, पूरग्रस्त नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बेजबाबदार कार्यपद्धतीने जनतेस गंभीर पूरपरिस्थितीत लोटणाऱ्या गोदावरी सिंचन विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांविरुद्ध गुन्हा नोंद करावा, पूरग्रस्त आणि अतिवृष्टीने बाधित जनतेस ऑगस्ट २०१९ च्या शासन निर्णयाच्या तरतुदी लागू करून हेक्टरी ४० हजार रुपये अनुदान द्यावे, संपूर्ण खरीप पीक कर्ज माफ करावे, पीक विमा योजनेतून सर्व अतिवृष्टीबाधित तसेच पूरग्रस्त शेतकऱ्यांना १०० टक्के पीक नुकसान भरपाई जोखीम रकमेच्या प्रमाणात अदा करावी, ७२ तासांत तक्रार करण्याची पीक विमा योजनेतील चुकीची तरतूद रद्द करावी, बाधित क्षेत्रातील पीककापणी प्रयोग रद्द करावेत, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या आंदोलनात राजन क्षीरसागर, माणिक कदम, शिवाजी कदम, ओमकार पवार, नवनाथ कोळी, प्रकाश गोरे, आसाराम बुधवंत, शेख अब्दुल, ज्ञानेश्वर काळे, चंद्रकांत जाधव, नरहरी काळे, गजानन देशमुख, आदींसह बहुसंख्य पूरग्रस्त शेतकरी सहभागी झाले होते.
बंधाऱ्यांचे दरवाजे १५ सप्टेंबरपूर्वी बंद करू नयेत, असा शासन निर्णय असताना गोदावरी नदीवरील बंधारे १५ सप्टेंबरपूर्वी १०० टक्के पाण्याने भरण्यात आले. त्यानंतर धरणातून पाणी सोडण्यापूर्वी बंधाऱ्यातील पाणीसाठा, धरणांच्या दरवाजांची स्थिती या संदर्भात पाटबंधारे प्रशासनाने समन्वय ठेवला नाही. त्यामुळे गोदावरी आणि उपनद्यांना पूर आला. ही परिस्थिती कृत्रिमरीत्या निर्माण करण्यात आल्याचा आरोप राजन क्षीरसागर यांनी केला आहे.