लसीकरणाची कासवगती; गरज रोज ११ हजार डोसची, मिळतात केवळ दीड हजार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:17 IST2021-05-08T04:17:54+5:302021-05-08T04:17:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय असला, तरी जिल्ह्याला गरजेएवढी लस उपलब्ध ...

The pace of vaccination; Need 11,000 doses daily, get only one and a half thousand! | लसीकरणाची कासवगती; गरज रोज ११ हजार डोसची, मिळतात केवळ दीड हजार!

लसीकरणाची कासवगती; गरज रोज ११ हजार डोसची, मिळतात केवळ दीड हजार!

लोकमत न्यूज नेटवर्क

परभणी : कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय असला, तरी जिल्ह्याला गरजेएवढी लस उपलब्ध होत नसल्याने लसीकरण मोहीम कासवगतीने सुरू आहे. गेल्या १३५ दिवसांत फक्त १ लाख ९० हजार ३८२ नागरिकांना ही लस देण्यात आली आहे. सरासरी दररोज १५४७ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

जिल्ह्यात १८ वर्षांपेक्षा अधिक वयाचे जवळपास १२ लाख नागरिक आहेत. या बारा लाख नागरिकांचे लसीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. १६ जानेवारीपासून जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात झाली. गेल्या १३५ दिवसांमध्ये फक्त १ लाख ९० हजार ३८२ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. याच गतीने लसीकरण झाल्यास १२ लाखांचा टप्पा गाठण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे लसीकरणाला गती देण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची दररोज ११ हजार जणांचे लसीकरण करण्याची क्षमता आहे. तसे प्रत्यक्ष ६ मे रोजी याचा प्रत्यय यंत्रणेने आणून दिला. दररोज ११ हजारजणांचे लसीकरण झाल्यास जवळपास तीन महिन्यांत १२ लाखांचे उद्दिष्ट पूर्ण होते. परंतु, तेवढी लस उपलब्ध होत नाही.

१८ पेक्षा जास्त वयाच्या ७७७५ जणांचे लसीकरण

जिल्ह्यात आतापर्यंत १८ ते ४४ वर्षे वयाच्यादरम्यान असलेल्या जवळपास ६ लाख नागरिकांपैकी फक्त ७ हजार ७७५ जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. त्यामध्ये ७ हजार ७२३ जणांना पहिला डोस, तर फक्त ५२ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. सद्यस्थितीत लस उपलब्ध होत नसल्याने इच्छा असूनही अनेक व्यक्तींना लसीकरण केंद्रावरून परत जावे लागत आहे.

लसीकरण केंद्रांवर गोंधळच

लस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे, तर प्रत्यक्ष उपलब्ध साठा कमी असल्याने लसीकरण केंद्रावर गोंधळ होत आहे. परभणी शहरातही अशी परिस्थिती असताना, ग्रामीण भागातही याचा प्रत्यय ग्रामस्थांना येत आहे. सेलू तालुक्यातील चिकलठाणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लसीकरण केंद्रावर शुक्रवारी सकाळी ९ वाजल्यापासून नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. सकाळी ११ वाजता लसीकरण सुरू झाले. परंतु, पहिला की दुसरा डोस यावरून गोंधळ उडाला. अशातच कोव्हॅक्सिन की कोविशिल्ड याचीही स्पष्टता झाली नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.

कोविशिल्डचा दुसरा डोस घेण्यासाठी सकाळी ९ वाजता चिकलठाणा बु. येथील केंद्रावर रांगेत उभा होतो. दुपारी १.३० वाजता डोस मिळाला. यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने नियोजन करण्यात आले नाही. त्यामुळे केंद्रावर गोंधळाची स्थिती पाहावयास मिळाली.

- उद्धवराव आघाव, बोरकिनी

चिकलठाणा येथील आरोग्य केंद्रावर शुक्रवारी सकाळी ९ वाजता लस घेण्यासाठी उभा होतो. दुपारी ४ वाजता लस मिळाली. तब्बल ७ तास येथे रांगेमध्ये उभे रहावे लागले. केंद्रावर लसीकरणादरम्यान उडालेला गोंधळ व झालेली दिरंगाई मनस्ताप वाढविणारी होती.

- अशोक मोरे, देवगावफाटा

आतापर्यंत २ लाख ८ हजार लस मिळाल्या

जिल्ह्याला आतापर्यंत २ लाख ८ हजार ९०० लस प्राप्त झाल्या आहेत. १२ लाख लाेकसंख्येच्या तुलनेत हा पुरवठा अत्यंत असमाधानकारक आहे. लसीकरणाची गती वाढविण्यासाठी दररोज ११ हजार लस जिल्ह्याला मिळणे आवश्यक आहे.

Web Title: The pace of vaccination; Need 11,000 doses daily, get only one and a half thousand!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.