लसीकरणाची कासवगती; प्रत्येकाला दोन्ही डोस मिळण्यासाठी लागू शकतात दोन वर्षे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:18 IST2021-07-29T04:18:50+5:302021-07-29T04:18:50+5:30
परभणी : सहा महिन्यांपूर्वी कोरोना लसीकरण सुरू झाले असले तरी आतापर्यंत केवळ ३४ टक्के नागरिकांनीच पहिला डोस घेतला असून, ...

लसीकरणाची कासवगती; प्रत्येकाला दोन्ही डोस मिळण्यासाठी लागू शकतात दोन वर्षे !
परभणी : सहा महिन्यांपूर्वी कोरोना लसीकरण सुरू झाले असले तरी आतापर्यंत केवळ ३४ टक्के नागरिकांनीच पहिला डोस घेतला असून, दोन्ही डोस घेणाऱ्या नागरिकांची टक्केवारी केवळ सात टक्के एवढी आहे. त्यामुळे संपूर्ण लसीकरण होण्यास दोन वर्षांपर्यंतचा काळ लागण्याची शक्यता आहे.
आरोग्य यंत्रणेकडे मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्याची क्षमता आहे. मात्र मुबलक डोस उपलब्ध होत नसल्याने लसीकरण रखडत आहे.
मागील आठ दिवसांपासून लस घेण्यासाठी प्रतीक्षा करीत आहे. मात्र अनेक वेळा केंद्र बंद राहते. लस उपलब्ध झाली तर गर्दी अधिक असते. त्यामुळे प्रयत्न करूनही अद्याप पहिला डोसच मिळाला नाही. ग्रामीण भागासाठी मुबलक प्रमाणात डोस उपलब्ध करावेत. - रामा शेळके
कोरोना संसर्ग झाल्याने लसीकरण लवकर करून घेता आले नाही. कोरोना संसर्गानंतर दोन महिने थांबलो. त्यानंतर लस घेण्यासाठी आरोग्य केंद्रांवर चकरा मारल्या. मात्र बहुतांश वेळा ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात लस उपलब्ध होत नाही. - सत्यवान काळे
लसीकरण का वाढेना
जिल्ह्यात लसीकरणाची गती वाढविण्यासाठी मुबलक प्रमाणात लस उपलब्ध होणे आवश्यक आहे. मात्र राज्य शासनाकडून लसीच्या मात्रा कमी प्रमाणात मिळतात. त्यामुळे लसीकरण करण्याची क्षमता असतानाही अनेक केंद्र बंद ठेवावे लागत आहेत. लस ज्या प्रमाणात उपलब्ध होईल त्या प्रमाणे लसीकरण सत्र राबविले जात आहे. त्यामुळे लसीकरणाची गती कमी आहे.
कोरोना ओसरल्याचा परिणाम
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. रुग्णांची संख्याही घटली असून, व्यवहार पूर्वपदावर आले आहेत. त्यामुळे अनेक नागरिक कोरोनाच नाही तर लस कशाला घ्यायची, असा विचार करून लसीकरणाकडे पाठ फिरवत आहेत. त्यामुळे लसीकरणासाठी अनेक केंद्रांवर नागरिकांची संख्या कमी असल्याचे दिसत आहे. त्यात मागील काही दिवसांपासून लसीचा तुटवडाही जाणवू लागला आहे. दररोज उपलब्ध झालेली लस ग्रामीण भागात वितरित केली जाते. ती कमी पडत असल्याने पूर्ण क्षमतेचे लसीकरण होत नसल्याचे दिसत आहे.
४९ केंद्रांवर लसीकरण
जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र , उपकेंद्र, शहरी भागात नागरी रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये लसीकरणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. सुमारे २०६ केंद्रांवर लसीकरण केले जाऊ शकते. परंतु, मागील काही दिवसांपासून मुबलक प्रमाणात लस उपलब्ध होत नाही. त्यामुळे अनेक केंद्र बंद ठेवावे लागत आहेत. मंगळवारी २०६ पैकी केवळ ४९ केंद्रांवरच लसीकरण सत्र राबविण्यात आले.