पक्षीय विचारांना बाजूला सारून विरोधक आले एकत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:16 IST2021-02-14T04:16:38+5:302021-02-14T04:16:38+5:30
परभणी : जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पक्षीय राजकारण बाजूला सारून राज्य पातळीवर एकमेकांविरोधात असलेल्या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते एकत्र आल्याचे ...

पक्षीय विचारांना बाजूला सारून विरोधक आले एकत्र
परभणी : जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पक्षीय राजकारण बाजूला सारून राज्य पातळीवर एकमेकांविरोधात असलेल्या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते एकत्र आल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
राजकारणात आता वैचारिक मूल्य, तत्त्वनिष्ठा, पक्षनिष्ठा, त्याग, नि:स्वार्थ भावना या सर्व गोष्टी नावालाच राहिल्या आहेत. स्व:हित साधण्यासाठी व्यक्तिनिष्ठेलाच पक्षनिष्ठेचा मुलामा देऊन तत्त्वनिष्ठतेच्या गप्पा राजकीय नेते मंडळी व काही कार्यकर्त्यांकडून हाकल्या जात आहेत. परभणी जिल्ह्याचे राजकारणही गेल्या अनेक वर्षांपासून अशाच पद्धतीने सुरू आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील नेतेमंडळींची मुंबईत पत राहत नाही. परिणामी जिल्ह्याच्या विकासाची झोळी बहुतांश वेळा रिकामीच राहते. आतापर्यंत जिल्हास्तरावरील नेत्यांकडून राबविण्यात येणारा हा पॅटर्न आता गावपातळीवरील कार्यकर्तेही राबवू लागले आहेत. याची प्रचिती नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जिल्हावासीयांना अनुभवयास मिळाली. राज्यात सध्या शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या ३ पक्षांचे सरकार सत्तेत आहे. या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची आघाडी होणे अपेक्षित असताना महाविकास आघाडीतील घटक पक्षांपेक्षा विरोधातील पक्षाचे कार्यकर्ते जवळचे वाटल्याचा प्रकार अनेक ग्रामपंचायतींत सरपंचपद मिळविण्यासाठी झाल्याचे दिसून आले. विशेषतः जिंतूर व सेलू तालुक्यात ही बाब प्रकर्षाने जाणवली. या तालुक्यांत भाजपचे माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आ. विजय भांबळे याच्यात कट्टर राजकीय वाद असताना त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते ग्रा. पं. निवडणुकीत काही ठिकाणी एकत्र आले. त्यात जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथे भाजप व राष्ट्रवादीच्या पॅनलमध्येच लढत झाली असताना, समसमान जागा मिळाल्याने सरपंचपद मिळविण्यासाठी या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र आले. असेच चित्र धमधम, सावंगी म्हाळसा, टाकळखोपा, सायखेडा (बामणी), धानोरा बु. या ग्रामपंचायतींतही पाहावयास मिळाले. सेलू तालुक्यातही अशी परिस्थिती ही गावांमध्ये पाहावयास मिळाली. या तालुक्यातील वालुर, कुला कोलदांडी, हातनूर, देगाव फाटा, निपाणी टाकळी तसेच पाथरी तालुक्यातील पाटोदा या गावांमध्येही भाजपा-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पद मिळविण्यासाठी एकत्र आले. गंगाखेड तालुक्यातील झोला या गावात मात्र या सर्वांच्या पुढे जाऊन सर्वच पक्षांच्या नेत्यांचे फोटो स्थानिक पॅनलच्या जाहिरातींमध्ये दिसून आले.
शिववसेना-भाजपा एकत्र
राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा शिवसेना व भाजपामध्ये पराकोटीचा विरोध आहे; परंतु परभणी जिल्ह्यात शिवसेना नेहमीच भाजपला पूरक भूमिका घेत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला केला आहे. विशेषतः जिंतूर बाजार समितीच्या वादात हा विषय चर्चेत आला होता. आता ग्रामपंचायत निवडणुकीत आडगाव बाजार येथे भाजप व शिवसेना कार्यकर्ते पद मिळविण्यासाठी एकत्र आल्याचे पाहावयास मिळाले.
जिल्हा बँक निवडणुकीतही प्रत्यय
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ५ वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत असेच चित्र पाहावयास मिळाले होते. आता पुन्हा ही निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीतही इतिहासाची पुनरावृत्ती होण्याचे संकेत मिळत आहेत.