ऑनलाइन नोंदणी नागरिकांसाठी ठरतेय डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:17 IST2021-05-10T04:17:09+5:302021-05-10T04:17:09+5:30
परभणी : कोरोना लसीकरणाच्या नोंदणीसाठी ऑनलाइन अनेक अडथळे निर्माण होत असून, वेळेत नोंदणी व केंद्र निश्चिती होत असल्याने लस ...

ऑनलाइन नोंदणी नागरिकांसाठी ठरतेय डोकेदुखी
परभणी : कोरोना लसीकरणाच्या नोंदणीसाठी ऑनलाइन अनेक अडथळे निर्माण होत असून, वेळेत नोंदणी व केंद्र निश्चिती होत असल्याने लस मिळविण्यासाठी नागरिकांची तारांबळ उडत आहे.
जिल्ह्यात १८ ते ४४ वर्षे या वयोगटातील लसीकरण सुरू झाल्यानंतर कोविन या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करूनच लस दिली जात आहे. ही नोंदणी केल्यानंतर प्रत्येकाला लस घेण्याचा दिनांक आणि लसीकरण केंद्राची निवड स्वतःहून करावयाची आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रांना लसीचा ठरावीक कोटा निश्चित करून दिला आहे. त्यानुसार लसीकरणाचे शेड्युल्ड केले जात आहे. मात्र, परभणी शहरामध्ये नागरिकांना ऑनलाइन नोंदणी करताना अनेक अडथळे निर्माण होत आहेत. एखाद्या केंद्रावर लसीचा कोटा उपलब्ध असला तरी संबंधितांना ऑनलाइन ओटीपी लवकर प्राप्त होत नाही. ओटीपी प्राप्त होईपर्यंत केंद्रावरील लसीचा कोटा संपुष्टात येत आहे. ऑनलाइन नोंदणी करणाऱ्यांची वाढलेली संख्या लक्षात घेता शहरातील केंद्रांची संख्या वाढवावी तसेच प्रत्येकाला सुरळीत लक्ष मिळावी, यासाठी नोंदणीतील अडथळे देखील दूर करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशी नागरिकांची मागणी आहे. सध्या मात्र नोंदणी करण्यासाठी नागरिकांची मोठी तारांबळ उडत आहे. केंद्रांचा कोटा उपलब्ध झाल्यानंतर तो अवघ्या काही मिनिटांतच संपत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे ऑनलाइन नोंदणी नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
ग्रामीण भागात वाढला ओढा
कोरोना लसीकरणासाठी शहरांमध्ये एकूण ८ केंद्र आहेत. या केंद्रांवर वेळेत लसीची नोंदणी होत नसल्याने अनेकांनी आता ग्रामीण भागातील केंद्रावर लस घेण्याचा पर्याय निवडला आहे. त्यातूनच शहरापासून जवळ असलेले ग्रामीण भागातील लसीकरण केंद्र तसेच इतर तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या केंद्रांवर जाऊन लस घेणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.
जिल्ह्यातील लसीचा साठा संपला
जिल्हास्तरावर प्राप्त झालेल्या कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींचे केंद्रनिहाय वितरण करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा स्तरावर सध्या लसीचा साठा उपलब्ध नाही. केंद्रस्तरावर उपलब्ध लसीच्या माध्यमातूनच लसीकरण सत्र चालविले जात आहेत. रविवारी जिंतूर येथील एक लसीकरण केंद्र वगळता इतर सर्व ठिकाणी लसीकरण बंद ठेवण्यात आले. लस उपलब्ध असलेल्या केंद्रांवरच सोमवारी लसीकरण सत्र चालविले जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.