आता आषाढातही सहा लग्नतिथी,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:13 IST2021-07-18T04:13:41+5:302021-07-18T04:13:41+5:30
लग्न लावण्यासाठी वधू-वरांच्या पत्रिका पाहून शुभमुहूर्तावर लग्न लावले जातात. यामुळे बहुतांश जणांचा पंचांगामध्ये दिलेल्या लग्न तिथी व शुभमुहूर्तावर लग्न ...

आता आषाढातही सहा लग्नतिथी,
लग्न लावण्यासाठी वधू-वरांच्या पत्रिका पाहून शुभमुहूर्तावर लग्न लावले जातात. यामुळे बहुतांश जणांचा पंचांगामध्ये दिलेल्या लग्न तिथी व शुभमुहूर्तावर लग्न लावण्याचा प्रयत्न असतो. आषाढ महिन्यात आणि त्यानंतर लागणाऱ्या चातुर्मासात शक्यतो लग्न केले जात नाहीत. या काळात लग्न करावे की नाही, याविषयी पंचांगकर्त्यांमध्ये मतभिन्नता आहे. सध्या मुख्य काळातील लग्नतिथी संपल्या आहेत. आता आषाढ महिना सुरू झाला आहे. मागील वर्षीच्या लॉकडाऊनमुळे व यंदा पुन्हा तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता अनेकांकडून लग्न सोहळे आषाढ महिन्यात करण्याचा विचार केला जात आहे. यानुसार काहींनी तयारीही केली आहे. आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून यंदा पंचांगात आषाढातही लग्नतिथी दिल्या आहेत.
या आहेत लग्नतारखा
याच महिन्यात १० जुलैपासून आषाढ मासारंभ झाला. ८ ऑगस्ट रोजी आषाढी अमावस्या होऊन आषाढाची सांगता होणार आहे. १८, २२, २५, २६, २८, २९ जुलै व ४ ऑगस्ट या आषाढातील लग्नतिथी आहेत. याच दरम्यान २३ जुलै रोजी चातुर्मासारंभ होत आहे. तर, यानंतर ९ ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होत आहे. दिवाळीपर्यंत शक्यतो चातुर्मासात लग्न केले जात नाहीत.
आषाढात शुभ तारखा...
चातुर्मास तसेच आषाढात लग्न केले जात नाहीत. पण, अनेकांची अडचण लक्षात घेता पंचांगात दिलेल्या या महिन्यातील ६ ते ७ लग्नतिथीला शुभमंगल सावधान करता येतात. यासाठी अनेकांनी वधू-वरांची पत्रिका पाहून या तिथीला लग्न करता येतात.
- श्रीपाद गुरू धर्माधिकारी.
आषाढ महिन्यात शक्यतो लग्न किंवा शुभ कार्य केले जात नाहीत. मात्र, मागील वर्षीपासून सुरू झालेल्या कोरोनाच्या संसर्गामुळे अनेक लांबलेले लग्न आषाढात करण्याचा निर्णय वधू-वरांच्या कुटुंबांनी घेतला आहे. पंचांगात असलेल्या या आपत्कालीन तारखा आहेत. यामुळे पर्यायी तारखांना लग्न करण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे.
- संजय जोशी वझरकर
काही मंगल कार्यालयांत झाली नोंदणी
शहरातील काही मंगल कार्यालयांत आषाढातील काही तारखांची नोंदणी झाली आहे. तर, काही बोटांवर मोजण्याइतक्या मंगल कार्यालयांत ऑगस्ट, सप्टेंबरच्याही काही तारखा लग्नासाठी ठरविण्यात आल्या आहेत.
परवानगी ५० जणांचीच; पण...
शहरात केवळ ५० जणांच्या उपस्थितीतच लग्न पार पाडावे लागत आहे. यामुळे मंगल कार्यालय मालक अडचणीत आहेत. यातच मंगल कार्यालयामध्ये लग्न करण्याऐवजी कमी वऱ्हाडात हाॅटेल्समध्ये लग्न करण्याला प्राधान्य दिले जात आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे ही परवानगी किमान १०० ते २०० जणांना द्यावी, अशी मागणी होत आहे.