जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या संकल्पनेतून दि. २५ मे ते २५ जून या कालावधीत ग्रामीण व शहरी भागात ही मोहीम राबविली जाणार आहे. कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागापर्यंत पोहोचला असून, अनेक गावांमध्ये रुग्ण उपचार घेत आहेत. हा संसर्ग रोखण्यासाठी कोरोनामुक्त गाव ही मोहीम राबवली जात आहे. तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी प्रत्येक गावासाठी एक आणि मोठ्या गावांसाठी २ ते ३ पालक अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, नागरी भागात मनपा आयुक्त आणि नगरपालिकेच्या मुख्याधिकार्यांनी प्रभागनिहाय पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, पालक अधिकाऱ्यांनी कोरोना निर्मूलन समिती स्थापन करावी, या समितीत नगरपालिका कर्मचारी, ग्रामसेवक, शिक्षक, तलाठी, अंगणवाडी सेविका आदींचा समावेश करावा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. या मोहिमेंतर्गत प्रत्येक गावामध्ये ग्रामस्थांना मास्कचा वापर करणे बंधनकारक करावे, सॅनिटायझरचा वापर वाढवावा तसेच गावातील प्रत्येक नागरिकाची आरटी-पीसीआर चाचणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोविड निर्मूलन सर्वेक्षणाची पहिली फेरी दि. १ ते ७ जून आणि दुसरी फेरी दि. २० ते २७ जून या कालावधीत आयोजित करावी तसेच घरोघरी जाऊन संशयित नागरिकांची माहिती संकलित करणे, संशयित नागरिकांची कोरोना तपासणी करणे आदी उपाययोजना केल्या जाणार आहेत. तसेच शंभर टक्के लसीकरण करण्यावरही भर देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.
आता ‘कोरोनामुक्त गाव’ मोहिमेचा प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:18 IST