आता पुन्हा कोरोना चाचण्यांचा धडाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:13 IST2021-07-18T04:13:42+5:302021-07-18T04:13:42+5:30
परभणी : जून महिन्यात २४ हजार नागरिकांच्या आरटीपीसीआर चाचण्या झाल्या होत्या. याउलट जुलै महिन्याच्या पंधरा दिवसांत केवळ ८ हजार ...

आता पुन्हा कोरोना चाचण्यांचा धडाका
परभणी : जून महिन्यात २४ हजार नागरिकांच्या आरटीपीसीआर चाचण्या झाल्या होत्या. याउलट जुलै महिन्याच्या पंधरा दिवसांत केवळ ८ हजार नागरिकांच्याच तपासण्या झाल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग कमी झाला, तसा चाचण्यांकडेही दुर्लक्ष झाले; मात्र आता तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविल्याने जिल्ह्यात पुन्हा एकदा आरटपीसीआर चाचण्या वाढविण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत.
मागीलवर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत कोरोनाची पहिली लाट जिल्हावासीयांनी अनुभवली. त्यानंतर कोरोनाच्या अनुषंगाने कमालीची शिथिलता दिसून आली. त्यामुळे जानेवारी- फेब्रुवारीपासून हळूहळू रुग्णांची वाढ होत गेली आणि जिल्ह्याला दुसऱ्या लाटेला सामोरे जावे लागले. ही लाट पहिल्या लाटेच्या तुलनेत अधिक तीव्र होती. या काळात जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले. आता हा कोरोना संसर्ग कमी झाला असून, सर्व व्यवहार पूर्ववत झाले आहेत. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होत आहे. मास्क आणि सॅनिटायझरचाही वापर कमी झाल्याचे दिसत आहे. त्यातच पुन्हा तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आता कोरोना नको रे बाबा, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
पहिल्या दोन लाटेचा अनुभव प्रशासनाच्या गाठीला असून, ही परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, यासाठी पुन्हा एकदा आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. जून महिन्यात जिल्ह्यात २४ हजार ३४६ नागरिकांच्या आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या होत्या; तर ७ हजार १६२ नागरिकांची रॅपिड टेस्टने तपासणी करण्यात आली. त्यानंतर हळूहळू कोरोना संसर्ग कमी झाल्याने आरटीपीसीआरच्या तपासण्याही कमी करण्यात आल्या. १ ते १५ जुलै या काळात केवळ ८ हजार २९२ नागरिकांचीच आरटीपीसीआर तपासणी झाली. तर २ हजार १५१ नागरिकांची तपासणी रॅपिड टेस्टने झाली. जुलै महिन्याच्या तुलनेत निम्म्याने तपासणीचे प्रमाण घटले आहे.
संभाव्य लाटेपासून प्रतिबंधक करायचा असेल, तर आतापासूनच काळजी घेणे गरजेचे असल्याने प्रशासनाने आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. जास्तीत-जास्त तपासण्या करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात शहरी भागासह ग्रामीण भागातही पुन्हा एकदा आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्याची शक्यता आहे.
शहरात ठिकठिकाणी तपासणी
शहरात पोलीस प्रशासन आणि मनपाच्या कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांपासून आरटीपीसीआर चाचण्या वाढविल्या आहेत. जाम नाका, वसमत रोड, शिवाजी चौक या ठिकाणी आरटीपीसीआर तपासणी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे गांधी पार्क येथेही तपासणी सुरू करण्यात आली आहे. शनिवारी रस्त्याच्या दोन्ही बाजूला थांबून पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्या प्रत्येक नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी करून घेतली.
परभणी तालुकाच पिछाडीवर
मागील पंधरा दिवसांत परभणी तालुक्यातच सर्वात कमी तपासण्या झाल्या आहेत. या तालुक्यात केवळ ३७६ नागरिकांच्याच आरटपीसीआर तपासण्या करण्यात आल्या. याउलट गंगाखेड तालुक्यात मात्र २ हजार १०२ नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. इतर तालुक्यातील तपासण्यांची संख्याही जेमतेम आहे. त्यामुळे पुढील पंधरा दिवसांत या तालुक्यात किती तपासण्या होतात, याकडे लक्ष लागले आहे.
पंधरा दिवसांतील आरटीपीसीआर तपासण्या
जिंतूर : ५९३
परभणी : ३७६
गंगाखेड : २१०२
पूर्णा : ८४२
सेलू : ४८२
सोनपेठ : १३८९
पाथरी : ६९५
मानवत : ३८५
पालम : १४०८