कोरोनानंतर एकाही रुग्णाने चढली नाही रुग्णालयाची पायरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:13 IST2021-07-18T04:13:36+5:302021-07-18T04:13:36+5:30
कोरोनातून बरे झाल्यानंतर अनेकांना मधुमेह, रक्तदाब, श्वसनाचे आजार जडल्याची उदाहरणे आहेत. तर काही जणांना म्युकरमायकोसिस आणि बुरशीजन्य आजाराचा त्रास ...

कोरोनानंतर एकाही रुग्णाने चढली नाही रुग्णालयाची पायरी
कोरोनातून बरे झाल्यानंतर अनेकांना मधुमेह, रक्तदाब, श्वसनाचे आजार जडल्याची उदाहरणे आहेत. तर काही जणांना म्युकरमायकोसिस आणि बुरशीजन्य आजाराचा त्रास सहन करावा लागला; परंतु कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिस व इतर आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण कमी आहे. काही रुग्णांना कोरोनानंतर मधुमेह, दम्याचा त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत. या रुग्णांनी घरीच स्वतः ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन खरेदी करून उपचार घेतले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज अद्यापतरी भासली नाही. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात एकही रुग्ण उपचारासाठी दाखल झालेला नाही. त्यामुळे इतर जिल्ह्यात कोरोनामुक्तीनंतर रुग्णांमध्ये आजारांची गुंतागुंत वाढली असली तरी परभणी जिल्ह्यात मात्र हे प्रमाण अत्यल्प असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
पोस्ट कोविडचा मधुमेहींना अधिक धोका
कोरोनामुक्त झाल्यानंतर पुन्हा काही आजार बळावण्याची शक्यता असते. मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. त्याचप्रमाणे इतर गंभीर आजाराच्या रुग्णांनीदेखील कोरोनामुक्त झाल्यानंतर मूळ आजाराचे नियमित उपचार घेणे आवश्यक आहे.
कोरोनातून बरा पण श्वसनाचा त्रास
कोरोनातून बरे झाल्यानंतर अनेकांना श्वसनाचा त्रास जाणवत आहे. या रुग्णांना रुग्णालयात भरती करण्याची गरज नसली तरी कोरोनामुक्तीनंतर ऑक्सिजन घ्यावे लागत आहे. ज्या रुग्णांचा सिटी स्कोर १५पेक्षा अधिक होता, अशांना जोरात चालताना किंवा पायऱ्या चढताना दम लागण्याच्या तक्रारी आहेत. अशा रुग्णांनी घरीच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन आणून ऑक्सिजन घेतल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली नाही.
बरे झाल्यानंतर ही घ्या काळजी
मधुमेह आणि वजन अधिक असलेल्या रुग्णांमध्ये कोरोनानंतर श्वसनाचा त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत. काही जणांना कोरोनानंतर मधुमेह जडला आहे. तेव्हा अशा रुग्णांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. नियमित मधुमेहाची तपासणी करणे आवश्यक आहे. तसेच इतर आजारांच्या बाबतीतही काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोनामुक्त रुग्णांनी दररोज प्रथिनेयुक्त अन्न घ्यावे, ज्यात कडधान्य जसे की डाळी, अंडी आदींचा समावेश असलेले अन्न घ्यावे. तसेच स्वतःची शुगर लेव्हल मेंटेन ठेवण्यावर भर द्यावा.
कोरोनामुक्त झाल्यानंतर सध्या एकही रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालय अथवा इतर शासकीय रुग्णालयात उपचार घेत नाहीत. पोस्ट कोविडसाठी शासकीय रुग्णालयांमध्ये स्वतंत्र ओपीडी आहे. त्याठिकाणी तपासणीसाठी रुग्ण येतात; परंतु त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासत नाही.
- डॉ.किशोर सुरवसे, निवासी वैद्यकीय अधिकारी.