आता कोणीच नाही राहणार उपाशी; केशरी शिधापत्रिकाधारकांनाही मोफत धान्य !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:14 IST2021-05-29T04:14:41+5:302021-05-29T04:14:41+5:30
राज्य शासनाच्या वतीने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना आणि शेतकरी या योजनेत समाविष्ट असलेल्या रेशन कार्डधारकांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गंत ...

आता कोणीच नाही राहणार उपाशी; केशरी शिधापत्रिकाधारकांनाही मोफत धान्य !
राज्य शासनाच्या वतीने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना आणि शेतकरी या योजनेत समाविष्ट असलेल्या रेशन कार्डधारकांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गंत मोफत धान्य देण्यात येत आहे. परंतु या योजनेचा लाभ न मिळणाऱ्या कार्डधारकांना आत्तापर्यंत कसल्याही प्रकारचे धान्य मिळत नव्हते. सध्याची संचारबंदीची परिस्थिती लक्षात घेता राज्य शासनाने या केशरी रेशन कार्डधारकांनाही सवलतीच्या दराने १ किलो गहू व १ किलो तांदूळ देण्याचा निर्णय घेतला आहे. जून महिन्यापासून या धान्य वितरणास प्रारंभ होणार असल्याची माहिती या कार्यालयाच्या वतीने देण्यात आली. त्यामुळे या कार्डधारकांना दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यातील बीपीएलच्या ७० हजार ९२१ रेशन कार्डधारकांना यापूर्वीच शासनाच्या मोफत धान्य वाटप योजनेचा लाभ देण्यात येत आहे.
या कुटुंबीयांना दरमहा प्रतिव्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ असे एकूण ५ किलो धान्य देण्यात येते. जवळपास ३५ किलो धान्य या कुटुंबीयांना देण्यात येते.
अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांनाही या निकषानुसार मोफत धान्य देण्यात येते.
‘केशरी’च्या ८४ हजार कुटुंबांना मिळणार धान्य
जिल्ह्यात ८४ हजार ४२९ केशरी रेशन कार्डधारक व्यक्ती आहेत. यामध्ये ९२ कार्डधारकांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. शासनाच्या नव्या योजनेनुसार या कार्डधारकांना प्रतिव्यक्ती १ किलो गहू व १ किलो तांदूळ मिळणार आहे. यासंदर्भातील आदेश जिल्हा पुरवठा विभागाने सर्व तहसीलदारांना दिले आहेत.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना आणि शेतकरी योजनेंतर्गत समाविष्ट न झालेल्या परभणी जिल्ह्यातील एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना प्रतिमहा १ किलो गहू व २ किलो तांदूळ सवलतीच्या दराने वितरीत करण्यात येणार आहेत. प्रथम मागणी करणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वानुसार जून महिन्यात धान्य देण्यात येणार आहे. त्यानुसार पात्र शिधापत्रिकाधारकांनी शासनाच्या या योजनेचा लाभ घ्यावा.
- मंजुषा मुथा, जिल्हा पुरवठा अधिकारी