सरपंच पदासाठी नवनिर्वाचित सदस्यांची पळवापळवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:04 IST2021-02-05T06:04:50+5:302021-02-05T06:04:50+5:30

जिंतूर : तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतीत काठावरचे बहुमत मिळाल्याने अनेक ठिकाणी सरपंच पदासाठी नवनिर्वाचित उमेदवारांची पळवा पळवी करण्याचे प्रयत्न सुरू ...

Newly elected members for the post of Sarpanch | सरपंच पदासाठी नवनिर्वाचित सदस्यांची पळवापळवी

सरपंच पदासाठी नवनिर्वाचित सदस्यांची पळवापळवी

जिंतूर : तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतीत काठावरचे बहुमत मिळाल्याने अनेक ठिकाणी सरपंच पदासाठी नवनिर्वाचित उमेदवारांची पळवा पळवी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याने अनेक पॅनल प्रमुख निवडून आलेल्या उमेदवारांना सुरक्षित स्थळी हलवले जात असल्याचे चित्र जिंतूर तालुक्यात पहावयास मिळत आहे.

जिंतूर तालुक्यामध्ये १०१ ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका संपन्न झाल्या. अनेक ठिकाणी अटीतटीच्या निवडणुका झाल्याने स्पष्ट बहुमत कोणत्या पॅनलला मिळाले नाही. साधारण ७ सदस्य असणाऱ्या ग्रामपंचायतीत ४-३, ९ सदस्य असणाऱ्या ग्रामपंचायतीत ५-४, ११ सदस्य असणाऱ्या ग्रामपंचायतीत ६-५, १३ सदस्य असणाऱ्या ग्रामपंचायतीत ७-६ असे सदस्य निवडून आले आहे. सत्ताधारी पक्षातील एक सदस्य फुटला तर ग्रामपंचायत आपल्या हातून जाऊ शकते. यासाठी अनेक ठिकाणी सदस्यांच्या पळवापळवीला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायत पातळीवर ५ लाखापासून १० लाखापर्यंत सदस्यांना आमिष दाखविण्यात येत आहेत. शिवाय उपसरपंच हे मानाचे पद देण्यात येईल असेही आमिष दिल्या जात आहे. अनेक ग्रामपंचायतीमध्ये सदस्य निवडून येऊनही शेवटपर्यंत निवडून आलेल्या सदस्यांसोबत राहतील की नाही याबाबत शाश्वती नसल्याने प्रमुख हैराण झाले आहे. एकीकडे निवडणुकीमध्ये लाखो रुपये खर्च केलेला असताना व पॅनलमध्ये सदस्य निवडून येऊनही सत्ता येईल की नाही याबाबत शाश्वती नसल्याने पॅनलप्रमुख बेजार झाले आहे. त्यातच नवनिर्वाचित सदस्यांना आपल्याकडेच ठेवण्यासाठी अनेक पॅनलप्रमुखांनी निवडून आलेले सर्व सदस्य सहलीला पाठवले आहेत. अनेकांनी अज्ञात ठिकाणी सदस्य ठेवले आहेत. परिणामी निवडून येऊनही सत्ता येईल की नाही याची शाश्वती आता पॅनल प्रमुखांना राहिली नाही.

सरपंच निवडीच्या तारखेकडे लक्ष

एकीकडे लाखो रुपये खर्चून ग्रामपंचायत निवडणूक लढविली आता पॅनल प्रमुखांचे लक्ष सरपंच पदाच्या निवडीच्या तारखेकडे लागले आहे. यासंदर्भात प्रशासनाने अद्यापही तारखा जाहीर केल्या नसल्या तरी लवकरात लवकर तारखा जाहीर होतील. या आशेने अनेक सदस्य बाहेरगावी ठेवले असून अज्ञात स्थळी असणाऱ्या सदस्यांना पूर्ण रसद पुरवण्याची जबाबदारी गावातील पॅनल प्रमुख तसेच ज्यांना सरपंच व्हायचे आहे अशांनी बाळगली असल्याचे चित्र दिसत आहे.

Web Title: Newly elected members for the post of Sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.