हवामान बदलाला अनुरूप जलद संशोधनाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:18 AM2021-05-20T04:18:01+5:302021-05-20T04:18:01+5:30

परभणी : सातत्याने होणा-या हवामान बदलाचा पीक उत्पन्नावर परिणाम होत आहे. तेव्हा हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर जलद गतीने कृषी संशोधन ...

The need for rapid research to adapt to climate change | हवामान बदलाला अनुरूप जलद संशोधनाची गरज

हवामान बदलाला अनुरूप जलद संशोधनाची गरज

Next

परभणी : सातत्याने होणा-या हवामान बदलाचा पीक उत्पन्नावर परिणाम होत आहे. तेव्हा हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर जलद गतीने कृषी संशोधन होणे गरजेचे आहे. बदलत्या हवामानाला अनुकूल पिकांचे वाण, तंत्रज्ञान निर्माण करावे लागेल, अशी अपेक्षा मराठवाडा शेती साहाय्य मंडळाचे विश्वस्त विजयअण्णा बोराडे यांनी व्यक्त केली.

येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विस्तार शिक्षण संचालनालय व कृषी विभागाच्या वतीने १८ मे रोजी ऑनलाइन खरीप शेतकरी मेळावा पार पडला. उद्घाटनप्रसंगी बोराडे बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. अशोक ढवण तर प्रमुख पाहुणे म्हणून राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्रशांतकुमार पाटील, पुणे येथील कृषी तंत्रज्ञ उपयोजना संशोधन संस्थेचे संचालक लाखन सिंह यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे आदी उपस्थित होते.

विजयअण्णा बोराडे म्हणाले, मराठवाड्यातील सोयाबीन, तूर, ज्वारी, बाजरी आदी मुख्य खरीप पिकांचे अनेक वाण विद्यापीठाने विकसित केले असून ते शेतकऱ्यांत प्रचलित झाले आहेत. कपाशीमधील नांदेड ४४ हा बीटीमध्ये परावर्तित केला असून, या वाणाचे मुबलक बियाणे शेतकऱ्यांना मिळावे. विद्यापीठातील अनेक पदे रिक्त असल्याने मनुष्यबळाची समस्या आहे, असेही ते म्हणाले. मुख्य पिकांना पर्यायी पिकांचा विचार करावा लागेल. यात बांबू, बिब्बा, खजूर, जवस आदी पिकांच्या लागवडीवर संशोधन करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील म्हणाले, परभणी कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या नांदेड ४४ या कपाशीच्या वाणाची लागवड संपूर्ण देशात केली जात होती. अनेक वर्षे या वाणाने शेतकऱ्यांवर अधिराज्य गाजविले. सध्या विद्यापीठ विकसित सोयाबीन व तूर पिकांचे वाण शेतकऱ्यांमध्ये प्रचलित आहेत. शेतकरी बांधवांना थेट बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यासाठी विद्यापीठ आपल्‍या दारी तंत्रज्ञान शेतावरी हा नावीन्यपूर्ण उपक्रम विद्यापीठाने राबविला. त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाल्याचे पाटील म्हणाले. डॉ. लाखन सिंग यांनी मार्गदर्शन केले. डॉ. डी.बी. देवसरकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. वीणा भालेराव, डॉ. प्रवीण कापसे यांनी सूत्रसंचालन केले. मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ. व्ही.बी. कांबळे यांनी आभार मानले. मेळाव्याच्या यशस्वितेसाठी मुख्य अन्वेषक गोपाळ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश काकडे, रवी कुमार कल्लोजी, खेमचंद कापगाते, डॉ. अनिकेत वाईकर आदींनी सहकार्य केले.

अध्यक्षीय समारोपात कुलगुरू डॉ. अशोक ढवण म्हणाले, गेल्या पाच दशकांच्या कार्यकाळात कृषी शिक्षणाच्या माध्यमातून ९० हजारपेक्षा जास्त कुशल मनुष्यबळ विद्यापीठाने निर्माण केले असून, विविध क्षेत्रात कृषीचे पदवीधर कार्य करून समाज उभारणीत योगदान देत आहेत. संशोधनाच्या माध्यमातून शेतकरी उपयुक्त १४४ उन्नत वाण विकसित केले असून, ९०० पेक्षा जास्त पीक व्यवस्थापन, पीक संरक्षण, काढणीपश्‍चात हाताळणी व मूल्यवर्धन आदींबाबत सुधारित तंत्रज्ञान शिफारशी दिल्या आहेत. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर संशोधनात बदल केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: The need for rapid research to adapt to climate change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.