म्युकरमायकोसिस संपर्कामुळे होत नाही ; जिल्ह्यात पाच रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:15 IST2021-05-30T04:15:38+5:302021-05-30T04:15:38+5:30

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर राज्यभरात म्युकरमायकोसिस या आजाराची धास्ती सर्वांनी घेतली आहे. जिल्ह्यातही या आजाराचे पाच रुग्ण नोंद झाले ...

Myocardial infarction is not caused by contact; Five patients in the district | म्युकरमायकोसिस संपर्कामुळे होत नाही ; जिल्ह्यात पाच रुग्ण

म्युकरमायकोसिस संपर्कामुळे होत नाही ; जिल्ह्यात पाच रुग्ण

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर राज्यभरात म्युकरमायकोसिस या आजाराची धास्ती सर्वांनी घेतली आहे. जिल्ह्यातही या आजाराचे पाच रुग्ण नोंद झाले आहेत. हा काळ्या बुरशीचा आजार आहे. प्रतिकारशक्ती कमी झालेल्या मधुमेह, किडनी, कर्करोग यासारख्या गंभीर आजाराच्या रुग्णांना हा आजार होण्याची शक्यता असते. प्रत्येकाच्या शरीरात या काळ्या बुरशी असतात ; परंतु प्रतिकार क्षमता कमी झाल्यानंतर त्या मोठ्या प्रमाणात वाढू लागतात आणि एक एक अवयव निकामी करतात. प्राथमिक स्तरावर या आजाराची लक्षणे आढळताच वैद्यकीय उपचार घेतल्यास तो बरा देखील होऊ शकतो ; परंतु या आजाराकडे दुर्लक्ष केले तर मृत्यू ओढावतो. त्यामुळे गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. स्वतःची तसेच परिसराची स्वच्छता ठेवणे, त्याचप्रमाणे काही लक्षणे आढळली तर तत्काळ वैद्यकीय सल्ल्याने उपचार घेतल्यास रुग्णांना या आजारातून ही सुटका मिळू शकते. संपर्कातून हा आजार होत नाही. इतरांना त्याची लागण होण्याची कोणतीही भीती नाही. त्यामुळे नागरिकांनी भीती न बाळगता अशी लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांना तातडीने वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

जिल्ह्यात औषधी उपलब्ध

म्युकरमायकोसिस या आजारावर रुग्णांना प्राथमिक स्तरावर उपचार करण्याची सुविधा जिल्ह्यात उपलब्ध आहे. मध्यंतरी या आजारावर उपचारासाठी लागणाऱ्या औषधीचा तुटवडा निर्माण झाला होता ; परंतु तो आता पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे.

म्युकरमायकोसिसची लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांना अँफो टेरेसिन बी हे इंजेक्शन द्यावे लागते. या इंजेक्शनचा पुरेसा साठा जिल्ह्यात सध्या उपलब्ध आहे.

मात्र लवकर हा आजार दुसऱ्या टप्प्यात पोहोचल्यानंतर काही रुग्णांना शस्त्रक्रिया करावी लागते. ही सुविधा मात्र जिल्ह्यात उपलब्ध नाही. अशा रुग्णांना इतर जिल्ह्यातच उपचारासाठी जावे लागते.

म्युकरमायकोसिसची प्राथमिक लक्षणे

नाकातून रक्त बाहेर पडणे, डोळ्याच्या भोवती सूज येणे, डोळा लाल होणे, अति डोके दुखणे, नजर कमी होणे, एकाच वेळी दोन दोन व्यक्ती दिसणे, दात दुखणे, दाताच्या भोवती काळा स्तर जमा होणे अशी प्राथमिक लक्षणे आहेत. ही लक्षणे आढळल्यास रुग्णाने तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत.

ही घ्या काळजी

मधुमेह, डायलेसिसवरील रुग्ण, कर्करोग रुग्णांनी यासंदर्भात स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. या आजाराची प्राथमिक लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय सल्ल्याने उपचार घ्यावेत. आठवड्यातून किमान एक वेळेस शरीरातील साखरेचे प्रमाण तपासून घ्यावे, तसेच काही लक्षणे आढळल्यास कान नाक घसा तज्ज्ञांशी संपर्क करून तपासणी करून घ्यावी, प्रतिकारक्षमता कमी असणाऱ्या रुग्णांना हा आजार होण्याची शक्यता असते ; त्यामुळे अशा रुग्णांनी परिसर आणि स्वतःच्या स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे.

म्युकरमायकोसिस हा संपर्कामुळे होत नाही ; परंतु गंभीर आजार असणाऱ्या आणि ज्यांची प्रतिकारक्षमता कमी आहे अशा रुग्णांनी काळजी घेणे गरजेचे आहे. मधुमेह, किडनी आणि ज्यांना प्रतिकारक्षमता वाढीसाठी औषधी सुरू आहेत, अशा रुग्णांनी वेळोवेळी कान नाक घसा तज्ज्ञांमार्फत तपासणी करणे तसेच शुगर तपासणी नियमित करणे आवश्यक आहे.

डॉ. तेजस तांबोळी, कान, नाक, घसा तज्ज्ञ

गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. आठवड्यातून किमान एक वेळेस कान नाक घसा तज्ज्ञांमार्फत तपासणी करून घ्यावी, डोळ्यावर सूज, दात दुखू लागणे, टाळू दुखणे अशी लक्षणे आढळल्यास वैद्यकीय सल्ल्याने उपचार घेतले पाहिजेत.

डॉ. रुपेश नगराळे, मधुमेह तज्ज्ञ

म्युकरमायकोसिस हा संपर्कातून न होणारा आजार आहे. ज्यांची प्रतिकारक्षमता कमी आहे, अशांना डोळ्यांना सूज येणे, डोळा दुखणे, नजर कमी होणे अशी लक्षणे जाणवतात. ही लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत.

डॉ. हनुमंत भोसले नेत्र तज्ज्ञ

Web Title: Myocardial infarction is not caused by contact; Five patients in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.