ऊसतोडीच्या पैशावरून अपहरण केलेल्या व्यक्तीचा खून; दोन आरोपी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 19:40 IST2020-12-22T19:37:20+5:302020-12-22T19:40:01+5:30
१८ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात एक मृतदेह आढळून आला होता

ऊसतोडीच्या पैशावरून अपहरण केलेल्या व्यक्तीचा खून; दोन आरोपी अटकेत
परभणी: ऊसतोडीच्या पैशांच्या कारणावरुन अपहरण केलेल्या एका व्यक्तीचा आरोपींनी खून केल्याची बाब तपासात स्पष्ट झाली असून, ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणात दोघांना अटक केली आहे.
परभणी तालुक्यातील गव्हा येथील उत्तम नागोराव खरात हे ऊसतोडीसाठी कामाला गेले होते. त्यांनी काही रक्कम उचल म्हणून घेतली. त्यानंतर काही दिवसांपासून ते कामावर गेले नव्हते. याच दरम्यान १५ डिसेंबर रोजी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास त्यांना ऊसतोडीसाठी कामावर चल असे म्हणून आरोपींनी बळजबरीने उचलून नेले. या प्रकरणी उत्तम खरात यांचा मुलगा अक्षय खरात याने ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गजानन चांदू काळे (रा.साळपुरी तांडा), उत्तम गोरखनाथ काळे (रा.गव्हा) व इतर तिघांनी वडिलांना जबरदस्ती करुन पळवून नेल्याचे म्हटले. त्यावरुन आरोपींविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता.
याच दरम्यान १८ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात एक मृतदेह वाहून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. नवा मोंढा पोलिसांनी या मृतदेहाचा पंचनामा करुन ओळख पटविण्याचे काम सुरू केले. तेव्हा हा मृतदेह उत्तम खरात यांचा असल्याचे स्पष्ट झाले. ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश राहिरे यांनी घटनास्थळी जाऊन ओळख पटविली. तसेच अपहरण प्रकरणाच्या तपासाला गती दिली. त्यावेळी अपहरणकर्त्यांनीच उत्तम नागोराव खरात यांचा खून केल्याची बाब तपासात स्पष्ट झाली. दरम्यान, गजानन काळे आणि उत्तम काळे या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांनी खून केल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे अपहरणाच्या प्रकरणात खुनाचे कलम वाढविण्यात आले आहे, अशी माहिती गणेश राहिरे यांनी दिली.
फरार आरोपींचा शोध :
या खून प्रकरणात अन्य दोन आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, अपहरणासाठी वापरलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे.