महामारीतही मुन्नाभाई एमबीबीएस जोरात; कोरोना काळात बोगस डॉक्टरांवर कारवाई नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:13 IST2021-06-29T04:13:32+5:302021-06-29T04:13:32+5:30

परभणी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात बोगस डॉक्टरांची संख्या दोन आकड्यांमध्ये आहे. अनेक वेळा रुग्णांनी या बोगस डॉक्टरांकडून उपचार घेतल्यानंतर त्याचे ...

Munnabhai MBBS loud in epidemic; No action against bogus doctors during the Corona period | महामारीतही मुन्नाभाई एमबीबीएस जोरात; कोरोना काळात बोगस डॉक्टरांवर कारवाई नाही

महामारीतही मुन्नाभाई एमबीबीएस जोरात; कोरोना काळात बोगस डॉक्टरांवर कारवाई नाही

परभणी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात बोगस डॉक्टरांची संख्या दोन आकड्यांमध्ये आहे. अनेक वेळा रुग्णांनी या बोगस डॉक्टरांकडून उपचार घेतल्यानंतर त्याचे विपरीत परिणाम दिसून आल्यानंतर जिल्हा आरोग्य विभागाकडे त्या डॉक्टरची तक्रार केली. जिल्हा आरोग्य प्रशासनाकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार कारवाई करण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये ८१ बोगस डॉक्टरांवर कारवाई केली आहे. यामध्ये पूर्णा तालुक्यातील ३, परभणी तालुक्यातील ५, मानवत तालुक्यातील १४, सेलू तालुक्यात ५, पाथरी तालुक्यातील ५, जिंतूर तालुक्यातील ३९, गंगाखेड तालुक्यातील ६, सोनपेठ तालुक्यातील ३ तर पालम तालुक्यातील एका बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यात आली आहे. आरोग्य विभागाने रुग्णांची बोगस डॉक्टरांविरुद्ध तक्रार दाखल झाल्यानंतर कारवाई करण्यात आली. आजघडीला कोरोना काळात एकाही बोगस डॉक्टरवर आरोग्य विभागाने कारवाई केली नाही. त्यामुळे परभणी जिल्ह्यात महामारीत मुन्नाभाई एमबीबीएस जोरात असून कोरोनाच्या रुग्णांवरही सर्रास उपचार करत आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार मोकाट असलेल्या २५ बोगस डॉक्टरांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

तक्रार आली तरच कारवाई

जिल्ह्यात सद्यस्थितीत आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार १०६ बोगस डॉक्टरांची संख्या आहे. त्यामध्ये ८१ डॉक्टरांवर आरोग्य विभागाने कारवाई केली आहे. यानंतरही एखाद्या डॉक्टरविषयी तक्रार आली तर आरोग्य विभागाच्या वतीने कारवाई करण्यात येईल, असे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

गोरगरिबांच्या जीविताशी खेळ

परभणी तालुक्यासह जिल्ह्यात बहुतांश मोठ्या गावांमध्ये बोगस डॉक्टरांनी आपले दवाखाने थाटले आहेत. कोरोना काळात ताप, सर्दी, अंगदुखी ही लक्षणे दिसणाऱ्या ग्रामीण भागातील रुग्णांना शहरातील दवाखान्यात न येता या बोगस डॉक्टरांकडे दाखवून उपचार घेतले आहेत. विशेष म्हणजे या बोगस डॉक्टरांनीही बिनदिक्कतपणे गोरगरिबांच्या विचार न करता सरळ रुग्णांवर उपचार केले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाच्या दुर्लक्षाने गोरगरिबांच्या जीविताशी हे बोगस डॉक्टर खेळत असल्याचे जिल्ह्यात दिसून येत आहेत.

जिंतूर तालुक्यात अर्धशतक

परभणी जिल्ह्यातील ९ तालुक्यांमध्ये १०६ बोगस डॉक्टरांची संख्या असून त्यापैकी ८१ डॉक्टरांवर जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आले आहे. विशेष म्हणजे जिंतूर तालुक्यात ५२ बोगस डॉक्टरांची संख्या असून त्यापैकी ३९ डॉक्टरांवर आरोग्य विभागाने कारवाई केली आहे. उर्वरित बोगस डॉक्टर खुलेआमपणे सर्वसामान्यांच्या जीवनाशी खेळत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Munnabhai MBBS loud in epidemic; No action against bogus doctors during the Corona period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.