मराठवाड्यावर दुःखाचा डोंगर कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:15 IST2021-05-17T04:15:26+5:302021-05-17T04:15:26+5:30
परभणी : काँग्रेसचे खासदार आणि गुजरात राज्याचे प्रभारी ॲड. राजीव सातव यांच्या निधनाने मराठवाड्यातील एक उमदा तरुण नेता गमावला, ...

मराठवाड्यावर दुःखाचा डोंगर कोसळला
परभणी : काँग्रेसचे खासदार आणि गुजरात राज्याचे प्रभारी ॲड. राजीव सातव यांच्या निधनाने मराठवाड्यातील एक उमदा तरुण नेता गमावला, अभ्यासू आणि सर्वसामान्यांची तळमळ असलेला नेता हरपल्याची प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केली.
खा. राजीव सातव यांच्या निधनाने एक तरुण तडफदार नेता, एक अभ्यासू नेतृत्व गमावले आहे. काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध होते. त्यांच्या निधनाने मराठवाड्याची, जिल्ह्याची आणि काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली.
आ. सुरेश वरपूडकर
खा. राजीव सातव यांच्या निधनाने मराठवाड्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अत्यंत दुःखद अशी ही वार्ता आहे. अगदी तरुण वयात दिल्लीच्या राजकारणात आपला ठसा उमटविणारे तरुण अभ्यासू नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने मोठे दुःख झाले आहे.
आ. डॉ. राहुल पाटील
खा. राजीव सातव हे मला लहान भावासारखे होते. अत्यंत कमी वयात त्यांनी देश पातळीवर वेगळी ओळख निर्माण केली. एक अभ्यासू नेतृत्व, विकासाची जाण असलेला नेता, वैचारिक बांधिलकीशी तडजोड न करणारा नेता आणि सर्वसामान्यांचा नेता गमावला असून, संपूर्ण मराठवाडा पोरका झाला आहे.
माजी आ. सुरेश देशमुख.
माझे मार्गदर्शक खा. राजीवभाऊ सातव यांच्या अकाली निधनाने मोठा आघात झाला. राजीव भाऊंच्या छत्रछायेखालीच माझी राजकीय व सामाजिक कार्याची जडण-घडण झाली. उच्च शिक्षित, अभ्यासू आणि आक्रमक बाणा असलेल्या राजीव सातव यांनी काँग्रेस पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी मोठे योगदान दिले. कमी वयात त्यांनी दिल्लीच्या राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली. एक आश्वासक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांच्या निधनाने वैयक्तिक माझी व काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली. त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र आदरांजली.
-सिद्धार्थ हत्तीअंबिरे, परभणी
खा. राजीव सातव हे मला मोठ्या भावासारखे होते. त्यांचे मार्गदर्शन आणि छत्रछायेखालीच मी कार्य करीत आलो. अत्यंत कमी वयात त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या जाण्याने अत्यंत दुःख झाले. वैयक्तिक माझी आणि पक्षाची मोठी हानी झाली. त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो, अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो.
-रविराज देशमुख