जनावरांवर उपचारासाठी आता फिरते पशुचिकित्सालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:22 IST2021-08-24T04:22:55+5:302021-08-24T04:22:55+5:30
पशुधनाची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी त्यांचे आरोग्य उत्तम असणे गरजेचे आहे. त्यासाठी उत्कृष्ट दर्जाच्या पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे गरजेचे ...

जनावरांवर उपचारासाठी आता फिरते पशुचिकित्सालय
पशुधनाची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी त्यांचे आरोग्य उत्तम असणे गरजेचे आहे. त्यासाठी उत्कृष्ट दर्जाच्या पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे गरजेचे होते. ज्या भागामध्ये पशुधनाच्या तुलनेत पशुवैद्यकीय दवाखान्यांची संख्या कमी आहे आणि दळणवळणाच्या सुविधा अपुऱ्या आहेत, अशा तालुक्यांत पशुपालकांच्या दारापर्यंत पशुचिकित्सा सेवा पोहोचविण्यासाठी फिरते पशुचिकित्सा पथक स्थापन करण्यात आले आहे. परभणी तालुक्यासाठी फिरत्या पशुचिकित्सा पथकासह उपकरणांनी सुसज्ज असलेले वाहन उपलब्ध करण्यात आले आहे. तसेच या फिरत्या पशुचिकित्सा पथकाची सेवा परिणामकाररित्या उपलब्ध करण्यासाठी १९६२ हा टोलफ्री क्रमांक उपलब्ध करुन दिला आहे. या फिरत्या पशुचिकित्सालयाच्या माध्यमातून पशुधनास कृत्रिम रेतन, औषधोपचार, लसीकरण, शस्त्रक्रिया, वंध्यत्व तपासणी, गर्भधारणा तपासणी आदी प्रकारच्या पशुवैद्यकीय सेवा पुरविल्या जाणार आहेत. परभणी तालुक्यातील पशुपालकांनी फिरते चिकित्सालय सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. आर. ए. कल्यापुरे यांनी केले आहे.