लघु विक्रेत्यांसाठी आमदारांचा पोलीस ठाण्यात ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:22 IST2021-06-09T04:22:03+5:302021-06-09T04:22:03+5:30
कोरोना प्रतिबंधक नियमानुसार प्रत्येक शनिवार आणि रविवारी शहरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या संदर्भात पोलिसांनी विक्रेत्यांना पूर्व कल्पना दिली ...

लघु विक्रेत्यांसाठी आमदारांचा पोलीस ठाण्यात ठिय्या
कोरोना प्रतिबंधक नियमानुसार प्रत्येक शनिवार आणि रविवारी शहरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या संदर्भात पोलिसांनी विक्रेत्यांना पूर्व कल्पना दिली असतानाही नियमांची अंमलबजावणी होत नसल्याने किरकोळ विक्रेत्यांचे वजन काटे तसेच काही दुकानांच्या चाव्या पोलीस प्रशासनाने जप्त केल्या होत्या. त्याचप्रमाणे शहरात दुचाकीचालकांवरही कारवाई करीत दुचाकी वाहने जप्त करण्यात आली. या संदर्भात आमदार मेघना बोर्डीकर यांच्याकडे विक्रेत्यांनी वारंवार तक्रारी केल्या. या तक्रारींची दखल घेऊन आमदार मेघना बोर्डीकर यांनी सोमवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास थेट पोलीस ठाणे गाठले. यावेळी किरकोळ विक्रेतेही त्यांच्यासमवेत उपस्थित होते. पोलीस निरीक्षक गोवर्धन भुमे यांच्याशी त्यांनी संवाद साधला. किरकोळ विक्रेत्यांची अडवणूक करू नका, त्यांना अवाजवी दंड आकारू नका, ज्या दुचाकीचालकांकडे कागदपत्रे आहेत त्यांनाही नियम डावलल्याचा दंड आकारून दुचाकी परत करण्याची सूचना त्यांनी केली. किरकोळ विक्रेत्यांचे जप्त केलेले वजन काटे त्यांना परत केल्याशिवाय पोलीस ठाण्यातून हलणार नाही, अशी भूमिका आमदार मेघना बोर्डीकर यांनी घेतली. पोलीस निरीक्षक भुमे यांनीही सकारात्मक विचार करीत जप्त केलेले विक्रेत्यांचे वजन काटे तसेच एका दुकानाची चावी परत केली. तसेच वजन काटे परत करताना विक्रेत्यांना दंडही आकारला नाही. त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. आमदार बोर्डीकर यांनी किरकोळ विक्रेत्यांसाठी आग्रही भूमिका घेतल्याने त्यांना न्याय मिळाला.
नियमांचे पालन करा
शहरातील किरकोळ विक्रेत्यांनी तसेच व्यापाऱ्यांनीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचे पालन करावे, शनिवार आणि रविवारी असे दोन दिवस संपूर्ण लॉकडाऊन असताना मुख्य रस्त्यावर गर्दी करू नये, कोरोना संसर्ग वाढणार नाही, याची काळजी घ्यावी, तसेच पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी आमदार मेघना बोर्डीकर यांनी केले.