दूध-साखरेचे दर जैसे थे, मग मिठाईच महाग का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:22 IST2021-09-15T04:22:39+5:302021-09-15T04:22:39+5:30
परभणी शहरात स्वीट मार्ट, हॉटेल्स तसेच विविध तयार खाद्यपदार्थ मिळणाऱ्या दुकानांची संख्या दोनशेहून अधिक आहे. या सर्व दुकानांमध्ये दूध, ...

दूध-साखरेचे दर जैसे थे, मग मिठाईच महाग का ?
परभणी शहरात स्वीट मार्ट, हॉटेल्स तसेच विविध तयार खाद्यपदार्थ मिळणाऱ्या दुकानांची संख्या दोनशेहून अधिक आहे. या सर्व दुकानांमध्ये दूध, साखर, खवा, मैदा यांसह अन्य साहित्यापासून मिठाई तयार केली जाते. जिलबी, गुलाबजामून, पेढा, बर्फी असे पदार्थ येथे मिळतात. सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर या साहित्याचे दर वाढल्याने तयार मिठाईचे दर वाढले आहेत. यामुळे सणासुदीत मिठाईचा गोडवा महागल्याचे दिसून आले.
मिठाईचे दर (प्रतिकिलो)
पेढा ३२० रुपये ३००
मोतीचूर लाडू २४० रुपये २००
मिठाई बर्फी ४०० रुपये ३५०
जिलबी १२० रुपये १००
गुलाबजामून २०० रुपये २००
का वाढले दर ?
मागील काही दिवसांमध्ये सिलिंडरचे दर दर ८ दिवसांला वाढत आहेत. यासह तेल, तूप, मैदा या पदार्थांचे दर वाढल्याने खाद्यपदार्थ तयार करण्यास जादा पैसे लागत आहेत. - स्वीट मार्ट चालक.
दूध आणि साखरेचे दर वाढले नसले तरी अन्य सर्व साहित्याचे दर वाढल्याने ग्राहकांना मिठाई महाग झाल्याचे वाटत आहे. मात्र, काही पदार्थांचे दर जैसे थे आहेत. - स्वीट मार्ट चालक
दरावर नियंत्रण कोणाचे ?
परभणी शहरातील स्वीट मार्ट चालकांकडून सणावारांच्या निमित्ताने दर विविध खाद्यपदार्थांचे दर वाढविले आहेत. मात्र, या दरावर कोणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे ग्राहकांना वाढीव दराने मिठाई व खाद्यपदार्थ खरेदी करावी लागत आहे.
भेसळीकडे लक्ष असू द्या
परभणी शहरात रस्त्यावर तसेच हातगाड्यावर विविध खाद्यपदार्थ बनविले जातात. त्यांच्या तपासणीकडे कोणाचेही लक्ष नसते. स्वीट मार्टमध्ये खाद्यपदार्थ तयार केले जातात. मात्र, ते किती दिवसापर्यंत वापरणे योग्य आहेत याची बेस्ट बिफोर तारीख दुकान मालक लावून ठेवत नाहीत. तसेच या पदार्थांची तपासणी अन्न व औषधी प्रशासन सणासुदीच्या काळात सातत्याने करत नाही.
ग्राहक म्हणतात
गणपतीच्या निमित्ताने मोदक, पेढे व अन्य गोड पदार्थ घरी आणले जातात. परंतु, या पदार्थांचे दर वाढले आहेत. सणवार आले की नेहमीच भाववाढ होते. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. - अतुल काळे.
गणपती व महालक्ष्मीसाठी घरोघरी लाडू, करंजी यासह पेढे, बर्फी आणली जाते. मागील वर्षीपेक्षा या वर्षी दर पन्नास रुपयांनी किलोमागे वाढल्याचे दिसून येते. या दरावर नियंत्रण असणे गरजेचे आहे. - कुणाल पाटील.