परभणी जिल्ह्यात बाजारपेठा बंद; वाहतूक सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:17 IST2021-03-26T04:17:54+5:302021-03-26T04:17:54+5:30
परभणी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली असून, गुरुवारी पहिल्याच दिवशी जिल्हाभरातील व्यापारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आल्याने ...

परभणी जिल्ह्यात बाजारपेठा बंद; वाहतूक सुरूच
परभणी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली असून, गुरुवारी पहिल्याच दिवशी जिल्हाभरातील व्यापारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आल्याने सुमारे ५० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प पडली आहे. विशेष म्हणजे, बाजारपेठा बंद असल्या तरी रस्त्यांवर मात्र नागरिकांची वर्दळ दिवसभर सुरू होती.
कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी २४ मार्च रोजी सायंकाळी सात वाजल्यापासून संचारबंदी लागू केली आहे. गुरुवारी पहिल्याच दिवशी सकाळपासून बाजारपेठ बंद राहिली. येथील गुजरी बाजार, शिवाजी चौक, कच्छी बाजार, गांधी पार्क, नानलपेठ परिसर, सराफा बाजार या भागात दिवसभर शुकशुकाट निर्माण झाला होता. संचारबंदीला व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला असला तरी प्रत्यक्षात गुरुवारी बाजारपेठेतील एकही दुकान सुरू नव्हते.
संचारबंदीमुळे बाजारपेठेतील उलाढाल ठप्प राहिली. जिल्ह्यात छोटे-मोठ्या व्यावसायिकांकडून साधारणत: दररोज ५० कोटी रुपयांची उलाढाल होते. त्यातून मजुरांना रोजगारही मिळतो. मात्र, बाजारपेठ बंद राहिल्याने ही उलाढाल ठप्प राहिली आहे.
संचारबंदी काळात अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. मात्र, असे असताना अनेक नागरिक विनाकारण रस्त्यांवरून फिरत असल्याचे दिसून आले. शहरातील प्रमुख रस्त्यांवर दिवसभर वर्दळ सुरू होती. हे वाहनधारक अत्यावश्यक सेवेतील आहेत का? ते का? फिरतात याबाबत प्रशासनाकडून विचारणा झाली नाही. त्यामुळे दुपारनंतर रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्या वाढू लागली. गुरुवारी पहिल्याच दिवशी बाजारपेठा कडकडीत बंद आणि रस्त्यांवरील वर्दळ सुरू, अशी स्थिती होती.
संचारबंदीमुळे गर्दीवर नियंत्रण
संचारबंदी लागू केल्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळाले असून, विविध हॉटेल्स, चहा स्टॉल्स आणि पान टपऱ्यांवर विनाकारण होणारी गर्दी बंद झाली आहे. तसेच बाजारपेठेतही सकाळी आणि सायंकाळच्या सुमारास होणारी गर्दी गुरुवारी दिसली नाही. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळाल्याचे दिसून आले.