बाजारपेठेत भाववाढ; ग्राहक हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:17 IST2021-05-11T04:17:52+5:302021-05-11T04:17:52+5:30
गंगाखेड : लॉकडाऊन काळात निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा घेत किराणा साहित्याची चढ्या दराने विक्री करून ग्राहकांची लूट केली जात ...

बाजारपेठेत भाववाढ; ग्राहक हैराण
गंगाखेड : लॉकडाऊन काळात निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा घेत किराणा साहित्याची चढ्या दराने विक्री करून ग्राहकांची लूट केली जात आहे. गरजेच्या वस्तूंची चढ्या भावाने विक्री करणाऱ्यांना प्रशासनाने लगाम घालावा, अशी मागणी तालुक्यातील ग्राहकांमधून होत आहे.
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने लागू केलेल्या संचारबंदीच्या काळात किराणा मालासह अन्य गरजेच्या वस्तूंचा तुटवडा असल्याचे भासवून गंगाखेड शहरातील ठोक व किरकोळ व्यापारी या वस्तूंची चढ्या भावाने विक्री करत आहेत. साखरेच्या दरात प्रतिकिलो १० रुपये, गोडेतेलाच्या दरात प्रतिलीटर मागे ५० ते ६० रुपये, मूगडाळ १५ ते २५ रुपये, तूर, मसूरडाळ ३० ते ३५ रुपये तसेच शेंगदाणा प्रतिकिलोच्या दरात ३० ते ४० रुपये, साबुदाणा २० ते २५ रुपये, रवा ८ ते १० रुपये, तांदळाच्या प्रतिकिलोमागे १० रुपयांपासून ते २५ रुपयांपर्यंत जादा दर आकारुन गरजेच्या साहित्याची चढ्या भावाने विक्री करत ग्राहकांची लूट केली जात आहे. त्यामुळे या भाववाढीवर नियंत्रण ठेवण्याऐवजी गलेलठ्ठ पगार घेऊन नियुक्त केलेले कर्मचारी व अधिकारी झोपेचे सोंग घेत असल्याने ग्राहकांची लूट होत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया तालुकावासीयांमधून व्यक्त होत आहेत. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन चढ्या भावाने किराणा साहित्यांची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी ग्राहकांमधून होत आहे.