घोषणांचाच बाजार, फेरीवाल्यांच्या हाती दमडीही पडली नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:16 IST2021-05-10T04:16:58+5:302021-05-10T04:16:58+5:30
परभणी शहरात ३४०५ फेरीवाल्यांची नोंद महापालिकेकडे आहे. लॉकडाऊन काळात राज्य शासनातर्फे गोरगरिबांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली. मागील महिन्यात ...

घोषणांचाच बाजार, फेरीवाल्यांच्या हाती दमडीही पडली नाही
परभणी शहरात ३४०५ फेरीवाल्यांची नोंद महापालिकेकडे आहे. लॉकडाऊन काळात राज्य शासनातर्फे गोरगरिबांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली. मागील महिन्यात १५ एप्रिल पूर्वी जाहीर केलेली ही मदत अद्यापही मिळालेली नाही. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेरीवाल्यांना प्रत्येकी १५०० रुपये देण्याची घोषणा केली होती. विशेष म्हणजे, महापालिकेने फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करताना आवश्यक ती कागदपत्रे घेतली आहेत. महापालिकेकडे आलेल्या अर्जातील पात्र आणि अपात्र अर्ज निश्चित करण्यासाठी समिती गठित केली आहे. ही समिती पात्र लाभार्थ्यांची यादी शासनाला सादर करणार आहे. त्यानंतर मदतीची रक्कम खात्यावर जमा होणार आहे. यास सुमारे २५ दिवसांचा कालावधी उलटला आहे. मात्र, अद्याप फेरीवाल्यांना मदतीची अपेक्षा लागली आहे.
अनेक फेरीवाल्यांची नोंदच नाही
शहरात फेरीवाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, यातील आलेल्या अर्जानुसार व ज्यांच्याकडे बँक खाते व अन्य कागदपत्रे आहेत अशांचीच नोंद झाली. ज्या फेरीवाल्यांकडे बँक खाते नाही असे फेरीवाले मदत मिळण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
शहरातील नोंदणीकृत फेरीवाले ३४०५
मी मागील तीन ते चार दिवस शासकीय कामानिमित्त बाहेरगावी होतो. याबाबत मला अद्याप माहिती नाही. मदत मिळाली का याची माहिती घेऊन कळवितो. - देविदास पवार, आयुक्त, मनपा.
लाॅकडाऊनने आमच्या दररोजच्या उत्पनावर पाणी फेरले आहे, शासनाने जाहीर केलेली मदत लवकर मिळणे गरजेचे आहे.
दररोज कमावले तरच घर चालते. शासनाच्या लाॅकडाऊनचा फटका बसत आहे. किमान जाहीर केलेली मदत खात्यात जमा करावी.
लाॅकडाऊन करण्यापूर्वी जाहीर केलेली मदत मिळेल असे वाटले होते. मात्र, लाॅकडाऊनचा कालावधी वाढतोय, त्यामुळे रोजगार पण बुडतोय. अद्याप मदत मिळाली नाही.