मराठवाडा बनले बर्ड फ्लूचे केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:42 IST2021-01-13T04:42:43+5:302021-01-13T04:42:43+5:30

राज्यात सर्वप्रथम परभणी जिल्ह्यातील मुरूंबा येथे ८०० कोंबड्यांचा बर्ड फ्लूने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर या जिल्ह्यातील कुपटा येथे ...

Marathwada became the center of bird flu | मराठवाडा बनले बर्ड फ्लूचे केंद्र

मराठवाडा बनले बर्ड फ्लूचे केंद्र

राज्यात सर्वप्रथम परभणी जिल्ह्यातील मुरूंबा येथे ८०० कोंबड्यांचा बर्ड फ्लूने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर या जिल्ह्यातील कुपटा येथे ५००, तर बनवस येथे १६० कोंबड्यांचा मृत्यू झाला असून, याबाबतचा अहवाल अद्याप प्रयोगशाळेतून आलेला नाही. लातूर जिल्ह्यातील केंद्रेवाडी येेथे ३५०, तर सुकणी येथे ८० कोंबड्यांचा बर्ड फ्लूने मृत्यू झाला आहे. वंजारवाडी येथेही ५५ कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच नांदेड जिल्ह्यातील चिंचोर्डी येथे १११ कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. प्रशासनाने संबंधित गावांना प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर केले असून, तेथे सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या गावांमध्ये पक्ष्यांच्या खरेदी-विक्रीला प्रतिबंध करण्यात आला आहे. कोंबड्यांबरोबरच कावळ्यांचा मृत्यू होण्याच्या घटनाही मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात समोर आल्या आहेत. बीड जिल्ह्यातील मुगगाव येथे ५ दिवसांत ३२ कावळ्यांचा मृत्यू झाला आहे, तर ब्रह्वावाडी येथे २ कावळे मृत आढळले आहेत. या जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील १२ गावांना कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील हुनगुंदा व जालना जिल्ह्यातील अंकुशनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहरा तालुक्यातील खेड येथे कावळे मृत आढळले आहेत. नांदेडमधील माहूर तालुक्यातील पोकुलवाडी, कंधार तालुक्यातील नावंद्याचीवाडी येथील कोंबड्या, बदक व कावळ्यांचे नमुने घेऊन ते भोपाळ येथील राष्ट्रीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. मराठवाड्यात बर्ड फ्लूचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत असून, प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात यासाठीची हेल्पलाईन सुरू करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. बर्ड फ्लूच्या अनुषंगाने येणाऱ्या तक्रारींची या हेल्पलाईनद्वारे नोंद घेऊन त्यासंदर्भात तातडीने कारवाई करण्यात येणार आहे.

बर्ड फ्लू हा विशिष्ट प्रजातींमध्ये पसरणारा आजार आहे. परभणी जिल्ह्यात या आजाराने कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे केवळ कोंबडी प्रजातीच्या पक्ष्यांमध्येच तसेच मोठ्या संख्येने पाळल्या जाणाऱ्या पक्ष्यांमध्ये हा आजार पसरण्याचा धोका आहे. पाळीव प्राण्यांना या आजाराचा धोका नाही. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही.

‌-डॉ. सुनील मोडक, पक्षी अभ्यासक, परभणी

Web Title: Marathwada became the center of bird flu