पैसे मोजताना हातचलाखी ; वृद्धाचे ३३ हजार लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:16 IST2021-04-15T04:16:55+5:302021-04-15T04:16:55+5:30
जिंतूर तालुक्यातील आंगलगाव येथील गंगाराम खंडुजी जायभाये (८०) हे १३ मार्च रोजी नातीच्या लग्नाचे साहित्य खरेदी करण्यासाठी जिंतूर येथे ...

पैसे मोजताना हातचलाखी ; वृद्धाचे ३३ हजार लंपास
जिंतूर तालुक्यातील आंगलगाव येथील गंगाराम खंडुजी जायभाये (८०) हे १३ मार्च रोजी नातीच्या लग्नाचे साहित्य खरेदी करण्यासाठी जिंतूर येथे आले होते. यासाठी त्यांनी गावातील एका व्यक्तीकडून ५० हजार रुपये हातऊसने घेतले होते. दुपारी १.३० च्या सुमारास शहरातील मेन चौककडे जाताना बुलडाणा अर्बन बँकेच्या समोर तोंडाला मास्क व डोक्याला पांढरा रुमाल बांधलेला एक दिव्यांग व्यक्ती तेथे आला. त्याने गंगाराम जायभाये यांना आपण अधिकारी आहोत, तुम्ही तोंडाला मास्क का लावला नाही, म्हणून रस्त्याच्या बाजूच्या गल्लीत त्यांना नेले आणि तुमच्या खिशात काय आहे, अशी त्यांना विचारणा केली. त्यांनी खिशातील ५० हजार रुपये काढून दाखवले असता, त्या व्यक्तीने ते पैसे घेतले. त्यानंतर पैसे मोजल्यासारखे करून काही नोटा त्यांच्या हातात दिल्या. पैशाला हात लावू नका कोणी काढून घेईल, म्हणून तो व्यक्ती निघून गेला. जायभाये यांना शंका आल्याने त्यांनी पैसे मोजून पाहिले असता त्यांना ३३ हजार रुपये कमी असल्याचे दिसून आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी जिंतूर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.