- सत्यशील धबडगेमानवत ( परभणी) : टेम्पो चालक ज्ञानेश्वर पवार यांचा खून करून फरार झालेल्या मारोती चव्हाण या आरोपीचा मृतदेह मानवत शिवारातील एका शेतातील विहिरीत गुरुवारी (१ ऑगस्ट) दुपारी सापडला. मृतदेहाची अवस्था पाहता चार ते पाच दिवसांपूर्वीच आत्महत्या झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
२६ जुलै रोजी कोक्कर कॉलनीतील टेम्पोचालक ज्ञानेश्वर पवार यांचा डोक्यात कुदळ मारून निर्घृण खून करण्यात आला होता. त्यानंतर आरोपी मारोती चव्हाण फरार झाला होता. सात दिवसांपासून विविध पोलिस पथकं त्याचा शोध घेत होती. दरम्यान, आंबेगाव नाका परिसरातील एका शेतातील विहिरीतून दुर्गंधी येत असल्याची माहिती महिलांनी पोलिसांना दिली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देवकते, शेख मुन्नू, नारायण सोळंके, सुनिलसिंग बावरी, सय्यद फैयाज, शरिफ पठाण, गुप्त शाखेचे विलास मोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीतील मृतदेह पाहिल्यानंतर तो खून प्रकरणातील आरोपी मारोती चव्हाण याचाच असल्याचे स्पष्ट झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे. पोलिसांनी प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे की, खून केल्यानंतर आरोपीने त्याच दिवशी आत्महत्या केली असावी.
पोलिसांवर दबाव वाढल्यानंतरच मृतदेह सापडलाखून प्रकरणाला आठवडा उलटूनही आरोपीचा शोध न लागल्याने संतप्त नागरिक आणि नातेवाईकांनी गुरुवारी पोलीस ठाण्यावर मूक मोर्चा काढून निषेध केला होता. त्यानंतर आरोपीचा आज मृतदेह सापडला. मृतदेहाची अवस्था पाहता मारोती चव्हाणने खून घडल्यानंतरच आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.