निम्न दुधनात ७८ टक्के, तर येलदरीत ६१ टक्के पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:13 IST2021-07-18T04:13:52+5:302021-07-18T04:13:52+5:30
दोन वर्षांपासून जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये मुबलक प्रमाणात पाणी साठा होत असल्याने उन्हाळ्यातील टंचाईची चिंता मिटली आहे. यावर्षीदेखील जिल्ह्यात अपेक्षित पावसाच्या ...

निम्न दुधनात ७८ टक्के, तर येलदरीत ६१ टक्के पाणीसाठा
दोन वर्षांपासून जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये मुबलक प्रमाणात पाणी साठा होत असल्याने उन्हाळ्यातील टंचाईची चिंता मिटली आहे. यावर्षीदेखील जिल्ह्यात अपेक्षित पावसाच्या तुलनेत अधिक पाऊस नोंद झाला आहे. मागील आठवड्यात सर्वदूर अतिवृष्टी झाली. त्यामुळे प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे.
सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पात ३४४ दलघमी पाणी साठविण्याची क्षमता आहे. या प्रकल्पामध्ये सध्या २४२.२०० दलघमी (७८.८४) पाणीसाठा झाला आहे. ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाल्याने या प्रकल्पातील पाणी नदीपात्रात सोडण्यात आले होते. या वर्षीच्या पावसाळ्यात प्रथमच १४ दरवाजे उघडण्यात आले होते.
जिंतूर तालुक्यातील येलदरी प्रकल्पातही समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. ९३४ दलघमी क्षमतेच्या या प्रकल्पात ८०९.७७० दलघमी उपयुक्त पाणीसाठा जमा करण्याची क्षमता आहे. सद्य:स्थितीला प्रकल्पात ४९४.३८४ दलघमी म्हणजे ६१ टक्के पाणीसाठा झाला आहे. दोन्ही मोठ्या प्रकल्पांबरोबरच जिंतूर तालुक्यातील करपरा मध्यम प्रकल्पात १९.६४१ दलघमी (७९ टक्के) पाणीसाठा झाला असून, गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्पात ६.७८ (२५ टक्के) दलघमी पाणी साठवणूक झाली आहे. दोन्ही मध्यम प्रकल्पात मिळून ५१ टक्के पाणीसाठा झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.
पावसाळ्याच्या दोन महिन्यांतच जिल्ह्यात ४५२ मि.मी. पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत निम्मा पाऊस या दोनच महिन्यांत झाला असून, सिंचन प्रकल्प लवकरच १०० टक्के भरतील, अशी आशा निर्माण झाली आहे.