यंदा भरपूर पाऊस; कोरोनानंतर २८६ गावांना पुराची धास्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:22 IST2021-06-09T04:22:09+5:302021-06-09T04:22:09+5:30
परभणी : पावसाळ्याची चाहूल लागताच पूर परिस्थितीची धास्ती निर्माण होते. त्यामुळे पूर्वतयारी करणे गरजेचे झाले असून, आपत्ती व्यवस्थापन विभागाने ...

यंदा भरपूर पाऊस; कोरोनानंतर २८६ गावांना पुराची धास्ती
परभणी : पावसाळ्याची चाहूल लागताच पूर परिस्थितीची धास्ती निर्माण होते. त्यामुळे पूर्वतयारी करणे गरजेचे झाले असून, आपत्ती व्यवस्थापन विभागाने त्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.
गोदावरी, पूर्णा, दुधना, करपरा आणि मासोळी या जिल्ह्यातील प्रमुख पाच नद्या आहेत. या नदीकाठच्या गावांना पावसाळ्यामध्ये पुराचा धोका संभवतो. त्यामुळे या धोकादायक गावांमध्ये पावसाळ्यापूर्वीच प्रशासनाकडून उपाययोजना केली जाते. जिल्ह्यात एकूण २८६ गावे पूरबाधित गावांच्या यादीत मोडतात. या गावांमध्ये आतापर्यंत कधी ना कधी पूर आला आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी या गावांमध्ये प्रशासनाकडून उपाययोजना केली जाते. विशेष म्हणजे, पूरबाधित गावांमधील ९१ गावे लाल रेषेखाली आणि २७ गावे निळ्या रेषेखाली मोडतात. लाल रेषेखालील गावांत गंभीर स्वरूपाचा पूर येण्याची शक्यता असते. ही परिस्थिती पाहता आपत्ती व्यवस्थापन विभागाने पुरापासून बचाव करण्यासाठीचे साहित्य सज्ज ठेवले आहे. तसेच पुरामध्ये अडकल्यानंतर बचावात्मक काय कार्य करण्याविषयी प्रशिक्षण दिले जात आहे.
अग्निशमन यंत्रणाही सज्ज
पावसाळ्यात शहरी भागांमध्ये जुन्या इमारती पडून धोका निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये अग्निशमन विभागाकडून उपाययोजना केली जाते. सध्या अग्निशमन विभागाने ६ कटर, १ पंप असे साहित्य सज्ज ठेवले आहे. त्याचप्रमाणे महानगरपालिका प्रशासनाकडून धोकादायक इमारतींची यादी मिळवून त्या ठिकाणी सर्वेक्षणही केले जाणार असल्याचे अग्निशमन विभागातून सांगण्यात आले.
शहरातील ५० इमारती धोकादायक
शहरातील इमारतींचा महापालिकेतून सर्व्हे करण्यात आला आहे. आतापर्यंत ५० इमारती धोकादायक असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या इमारतींच्या मालकांना नोटीस देण्यात आली आहे. तसेच पुराच्या पाण्याचा धोका असणाऱ्या काही इमारतींच्या मालकांनाही महापालिकेकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत.
पूरबाधित क्षेत्र
परभणी, गंगाखेड, सोनपेठ आणि पालम या तालुक्यांमध्ये पूरबाधित क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. परभणी तालुक्यात २३, गंगाखेड १६, सोनपेठ १५ आणि पालम तालुक्यामध्ये १८ गावे पूरबाधित असून ती रेड झोनमध्ये येतात. या गावांवर प्रशासन विशेष लक्ष देत आहे.
जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर आणि निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवल्यास उपाययोजना करण्यासाठी बचाव पथके नियुक्त करण्यात आली आहेत. तसेच पुरापासून बचाव करण्यासाठीचे साहित्यही सज्ज ठेवले आहे.
- पवन खांडके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी.