४ हजार शेतकऱ्यांचा कागदपत्रे अपलोड करण्यास खो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:13 IST2021-06-27T04:13:08+5:302021-06-27T04:13:08+5:30
कृषी विभागाच्या योजनांची महाडीबीटी पोर्टलद्वारे अंमलबजावणी करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली. त्यानुसार, जिल्ह्यातील ५६ हजार शेतकऱ्यांनी १३ योजनांतील घटकांचा ...

४ हजार शेतकऱ्यांचा कागदपत्रे अपलोड करण्यास खो
कृषी विभागाच्या योजनांची महाडीबीटी पोर्टलद्वारे अंमलबजावणी करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली. त्यानुसार, जिल्ह्यातील ५६ हजार शेतकऱ्यांनी १३ योजनांतील घटकांचा लाभ मिळविण्यासाठी कृषी विभागाकडे अर्ज दाखल केले आहेत. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत २० हजार शेतकऱ्यांनी प्रस्ताव दाखल केले. कृषी विभागाच्या वतीने प्रस्ताव दाखल केलेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, उडीद, मूग आदी पिकांना पाणी देण्यासाठी अनुदानतत्त्वावरील तुषार सिंचन, ठिबक सिंचन, पाइप यासह आदी घटकांचा लाभ व्हावा, यासाठी ऑनलाइन सोडत काढण्यात आली. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनांतर्गत तीन ऑनलाइन सोडती आतापर्यंत काढण्यात आल्या आहेत. त्यामध्ये ७ हजार ४६९ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या शेतकऱ्यांच्या मोबाइलवर महाडीबीटीद्वारे संदेश पाठविण्यात आला आहे. या संदेशामध्ये निवड झालेल्या शेतकऱ्यांनी सातबारा, होर्डिंग यासह आदी कागदपत्रे ३० जूनपूर्वी अपलोड करावीत, असे आव्हान जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस.बी. आळसे यांनी केले आहे. मात्र, आतापर्यंत २ हजार ५४५ शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे अपलोड करून कृषी विभागाकडून पूर्वसंमतीने घेतले आहे. परंतु, निवड झालेल्यांपैकी ३ हजार ९२४ शेतकऱ्यांनी अद्यापही ऑनलाइन प्रणालीवर कागदपत्रे अपलोड केली नाहीत. त्यामुळे प्रतीक्षायादीतील शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे. कृषी विभागाने निवड झालेल्या शेतकऱ्यांनी तत्काळ कागदपत्रे अपलोड करावीत, असे आवाहन केले. मात्र, या आवाहनालाही शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ३ हजार ९२४ शेतकरी प्रधानमंत्री कृषी सूक्ष्म सिंचन योजनेंतर्गत अनुदानावरील साहित्य मिळवण्यापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
...तर नाव होईल रद्द
प्रधानमंत्री कृषी सूक्ष्म सिंचन योजनेंतर्गत निवड झालेल्या शेतकऱ्यांपैकी ३९२४ शेतकऱ्यांनी कागदपत्रे अपलोड केली नाहीत. त्यामुळे ३० जूनपूर्वी म्हणजे चार दिवसांत संबंधित कागदपत्रे तत्काळ अपलोड करावीत, अन्यथा आपले निवडयादीमधील नाव रद्द करण्यात येईल व प्रतीक्षायादीतील शेतकऱ्यांना संधी दिली जाईल, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. संतोष आळसे यांनी केले आहे.
ग्रापंच्या सूचना फलकावर यादी
जिल्हा कृषी विभागाच्या वतीने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांची निवड झाली आहे, त्यांची नावे संबंधित ग्रामपंचायतीच्या फलकावर डकविण्यात आली आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या नावाची निवड झाली आहे, त्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर कागदपत्रे अपलोड करण्याची गरज आहे.