रस्ता कामाच्या गुणवत्तेला कंत्राटदारांकडून खो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:19 IST2021-02-11T04:19:10+5:302021-02-11T04:19:10+5:30
गंगाखेड ते परभणी राज्य मार्ग २४८ ला जोडण्यासाठी तालुक्यातील भांबरवाडी, सुनेगाव ते मुळीमार्गे धारखेड व दुस्सलगावाला जाणाऱ्या रस्त्यांच्या कामाला ...

रस्ता कामाच्या गुणवत्तेला कंत्राटदारांकडून खो
गंगाखेड ते परभणी राज्य मार्ग २४८ ला जोडण्यासाठी तालुक्यातील भांबरवाडी, सुनेगाव ते मुळीमार्गे धारखेड व दुस्सलगावाला जाणाऱ्या रस्त्यांच्या कामाला मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सुरुवात करण्यात आली. यात नागठाणा पाटी, सुनेगाव ते मुळीमार्गे धारखेडला जोडणाऱ्या अंदाजे १० किलोमीटरच्या रस्त्याला ४ कोटी ८९ लाख ९२ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या कामाला १६ मे २०१७ रोजी सुरुवात करण्यात आली. हे काम १५ डिसेंबर २०२० रोजी पूर्ण करण्याची कंत्राटदाराला मुदत देण्यात आली, तसेच याच राज्य मार्गावरील भांबरवाडी गावाला जोडणाऱ्या अंदाजे २ किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी १ कोटी ३८ लाख ११ हजार व दुस्सलगाव या गावाला जोडणाऱ्या अंदाजे दीड किलोमीटर रस्त्याच्या कामाला ९८ लाख ८३ हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला. ३ ऑगस्ट २०१९ रोजी मुख्यमंत्री सडक योजनेतून या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. या दोन्ही रस्त्याचे काम २ मे २०२० रोजी पर्यंत पूर्ण करण्याची मुदत असतानासुद्धा आजही या रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत असल्याचे पाहावयास मिळत आहे. यात मुख्य म्हणजे गंगाखेड-परभणी रस्त्यावरील नागठाणा पाटी, सुनेगावमार्गे मुळी, धारखेडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी निविदेत समाविष्ट असलेल्या बांधकाम साहित्याचा अत्यंत कमी प्रमाणात वापर करण्यात आला आहे, तसेच साइड पट्ट्यांमध्ये टाकलेल्या मुरमासह काम पूर्ण होण्याआधीच रस्त्याचे डांबरीकरण उखडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तालुक्यातील कामांची गुणवत्ता तपासणीसाठी कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी तालुकावासीयांतून होत आहे.
रस्त्याच्या कामाबरोबर पुलाचे कामही निकृष्ट
नागठाणा पाटी ते सुनेगावदरम्यान असलेल्या इंद्रायणी नदीला पावसाळ्यात थोडासा पाऊस झाला तरी या नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे. मात्र, या रस्त्यावरील इंद्रायणी नदीच्या पुलाची कसल्याही प्रकारची उंची न वाढविता पुलावर सिमेंट रस्ता तयार केल्याचे पाहावयास मिळत आहे. आगामी पावसाळ्यात पावसाचे थोडेसे पाणी आले तरीही सुनेगाव, मुळी, नागठाणा, धारखेड आदी गावांचा गंगाखेड ते परभणी मुख्य राज्य मार्गाशी संपर्क तुटणार असल्याचे ग्रामस्थांतून बोलले जात आहे. पुलाची उंची न वाढविता पुलावरील रस्ता करण्याचा फायदा काय, असा सवाल या भागातील ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे.