शासनाने ग्रामीण भागात आरोग्यसेवा पुरवण्यासाठी प्राथमिक आरोग्य केद्रांची संख्या वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे. आधुनिक उपचार, नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक सोयी - सुविधा असणारे उपचार प्राथमिक आरोग्य केद्रात म्हणावे तसे नसल्याने रुग्णांना तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे लागतात. गंभीर आजारी रुग्णांना उपयुक्त उपचार प्राथमिक आरोग्य केद्रांवर मिळत नाहीत. आरोग्य सेवेची तोकडी यंत्रणा, वाढत्या लोकसंख्येवर अपुरी पडत आहे. तालुका आरोग्य कार्यालयअंतर्गत असलेल्या राणीसावरगांव येथील प्राथमिक आरोग्य केद्राअंतर्गत ४९ गावे आहेत. लोकसंख्या ३५ हजार २ एवढी आहे. पिपळदरी प्राथमिक आरोग्य केंद्रावर ३१ गावांचा भार आहे. येथील लोकसंख्या ३७ हजार ३१ एवढी आहे. कोद्री प्राथमिक आरोग्य केद्राअंतर्गत २९ गावे आहेत. येथील लोकसंख्या ४१ हजार ३८२ आहे. महातपुरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २० गावांचा समावेश आहे. लोकसंख्या २७ हजार ८४२ एवढी आहे. धारासूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १४ गावे असून, लोकसंख्या २४ हजार ८३४ एवढी आहे. तालुक्यातील तहसील कार्यालयाअंतर्गत असलेली १०४ गावे या पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येतात. पालम, सोनपेठ तालुक्यातील ३९ गावे गंगाखेड तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येतात. एकूण १४३ गावातील १ लाख ६६ हजार ९१ लोकसंख्येला केवळ पाच प्राथमिक आरोग्य केद्रांतून आरोग्यसेवा पुरवण्याचा भार पडल्याने ग्रामीण आरोग्यसेवा ढासळत चालली आहे. त्यामुळे तालुका व जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन ग्रामीण भागातील रुग्णांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.
५ प्राथमिक आरोग्य केद्रांवर १४३ गावांचा भार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:18 IST